देवेंद्र फडणवीस: क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेणार

मुंबई:

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील जागतिक विकासाचे तीन मुख्य आधारस्तंभ ठरणार असून, या क्षेत्रात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत असे स्वतंत्र 'महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन' प्रभावीपणे राबवून राज्यात एक सक्षम आणि मजबूत क्वांटम इकोसिस्टीम उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने आयोजित क्वांटम टेक्नॉलॉजी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन करत होते. या उच्चस्तरीय कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल बी. रेड्डी, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह आयसर, सी-डॅक आणि विविध नामांकित शैक्षणिक संस्थांचे प्राध्यापक व वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या जग अतिशय वेगाने बदलत असून डेटा-आधारित अर्थव्यवस्थेपासून आता उच्च गतीच्या डेटा प्रोसेसिंगच्या युगात आपण प्रवेश करत आहोत. भविष्यातील जागतिक स्पर्धेत एआय, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान अत्यंत निर्णायक भूमिका बजावणार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच क्वांटम क्षेत्रातही भारताने आपल्या कुशल मनुष्यबळाच्या बळावर जागतिक नेतृत्व मिळविण्याची मोठी संधी साधली पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला. केंद्र सरकारने राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद केली असून, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन राज्याचे स्वतंत्र मिशन राबवत आहे. या अंतर्गत प्रशिक्षित प्राध्यापकांच्या माध्यमातून पुढील टप्प्यात ५०० प्रशिक्षक आणि त्यानंतर किमान ५ हजारांहून अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट राज्याने ठेवले आहे.

क्वांटम तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे आगामी काळात अभियांत्रिकी, वैद्यकीय, अवकाश, उद्योग आणि संरक्षण अशा सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांत मोठी क्रांती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. बदलत्या काळानुसार पुढील काही वर्षांत रोजगार क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने बदलणार असल्याने विद्यार्थी आणि प्राध्यापकांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी आजपासूनच सक्षम करणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात आयसर, सी-डॅक, टीआयएफआर, आयआयटी मुंबई, सीओईपी आणि व्हीएनआयटीसारख्या नामांकित राष्ट्रीय संस्थांमध्ये क्वांटम क्षेत्रातील क्षमता आधीच विकसित होत आहे. या सर्व संस्थांची ताकद एकत्रित करून राज्याचे क्वांटम मिशन अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, या प्रशिक्षणासाठी विकसित करण्यात आलेले अद्ययावत अभ्यासक्रम, एलएमएस आणि ‘चंद्र’ व ‘सूर्य’ हे चॅटबॉट्स विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमात सहभागी सर्व संस्था, तज्ज्ञ आणि प्राध्यापकांचे विशेष कौतुक केले.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

६ बॉलवर ६ सिक्स मारणारा 'तो' जादूगार हरपला!

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software