- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- नवी मुंबईत परप्रांतीयांची मुजोरी; सायन-पनवेल महामार्गावर नागरिकांवर हातोडीने हल्ला!
नवी मुंबईत परप्रांतीयांची मुजोरी; सायन-पनवेल महामार्गावर नागरिकांवर हातोडीने हल्ला!
नवी मुंबई:
जुईनगर रेल्वे स्थानक परिसरातील सायन-पनवेल महामार्गाच्या बाजूला अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांची मुजोरी कमालीची वाढली असून, एका जागरूक नागरिकाने विचारणा केली असता त्यांच्यावर हातोडीने जीवघेणा हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परिसरात महामार्गालगतच वडापाव, चहा आणि इतर खाद्यपदार्थांची बेकायदेशीर दुकाने थाटण्यात आली आहेत. या अनधिकृत स्टॉल्समुळे मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून रोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अत्यंत वर्दळीच्या या हायवेवर बेजबाबदारपणे गाड्या उभ्या राहत असल्याने दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत, ज्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
या रोजच्या त्रासाला कंटाळून काही नागरिकांनी महामार्गावरील या अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी तिथे व्यवसाय करणाऱ्या बिपीन नावाच्या एका परप्रांतीय व्यक्तीने नागरिकांवर थेट हल्ला चढवला. त्याने हातात लोखंडी हातोडी घेऊन उपस्थित नागरिकांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्यावर जीवघेणा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित आणि हिंसक प्रकारामुळे जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परप्रांतीय विक्रेत्यांच्या या वाढत्या गुंडगिरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महामार्गासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे सर्रासपणे अनधिकृत धंदे सुरू असल्याने आणि थेट नागरिकांवर शस्त्र उगारले जात असल्याने पोलिसांच्या आणि महानगरपालिकेच्या भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, सायन-पनवेल महामार्गावरील ही सर्व अवैध दुकाने तातडीने हटवण्यात यावीत आणि नागरिकांवर हातोडीने हल्ला करणाऱ्या बिपीन नावाच्या मुजोर विक्रेत्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
