देशातील पहिल्या 'हायड्रोजन ट्रेन'ला पीएम मोदी दाखवणार हिरवा झेंडा!

 हरियाणा:

 भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज एक सुवर्णपान जोडले जाणार आहे. देशातील पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रेनचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केला जाणार आहे. हरियाणातील जींद आणि सोनीपत रेल्वे स्थानकांदरम्यान ही पर्यावरणपूरक ट्रेन धावणार आहे. या ऐतिहासिक क्षणासोबतच हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रेन चालवणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरणार आहे. यापूर्वी केवळ जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीन या देशांनीच हे तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळवले असून, जागतिक स्तरावर भारताची ही झेप अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

जींद ते सोनीपत दरम्यानचा ८९ किलोमीटरचा प्रवास ही हायड्रोजन ट्रेन अवघ्या दोन तासांत पूर्ण करणार आहे. १० डब्यांची ही आधुनिक ट्रेन या मार्गावरील एकूण १४ स्थानकांवर थांबणार असून, तिचा कमाल वेग ताशी ७५ किलोमीटर इतका असेल. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात या ट्रेनचा प्रवास उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचे तिकीट भाडे अवघे ५ रुपयांपासून ते २५ रुपयांपर्यंत असणार आहे. एकदा पूर्ण इंधन भरल्यानंतर ही ट्रेन तब्बल ३५६ किलोमीटरचे अंतर सहज पार करू शकते, ज्यामुळे कमी इंधनात मोठा प्रवास शक्य होणार आहे. या रेल्वेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जींद येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार असून, यादरम्यान ते एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅक आणि दोन वैद्यकीय महाविद्यालयांसह एकूण ९ महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत.

या पहिल्या हायड्रोजन ट्रेनचे सारथ्य करण्याची ऐतिहासिक जबाबदारी जींद मुख्यालयातील अनुभवी लोको पायलट राजेश कुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या नव्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, ही ट्रेन पारंपारिक डिझेल किंवा इलेक्ट्रिक ट्रेनच्या तुलनेत अधिक शक्तिशाली आणि पूर्णपणे ध्वनिरोधक (साऊंडप्रूफ) आहे. या ट्रेनचा पिक-अप कमालीचा सुधारला असल्याने रेल्वेचे संचालन अधिक सुलभ आणि सुरक्षित होते. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून, लोको पायलट थेट प्रवाशांशी संवाद साधत नाही. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना मदत हवी असल्यास लोको पायलट ट्रेन व्यवस्थापकाशी संपर्क साधतात आणि त्यानंतर 'पब्लिक ॲड्रेस सिस्टीम'द्वारे प्रवाशांना तात्काळ आवश्यक ती मदत पुरवली जाते.

ट्रेनच्या पर्यावरणपूरक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकताना लोको पायलट राजेश कुमार यांनी स्पष्ट केले की, ही ट्रेन अत्याधुनिक हायड्रोजन फ्युएल सेलने सज्ज आहे. यामध्ये ८.५ बार दाबाने हायड्रोजन वायू पुरवला जातो, तर दुसऱ्या बाजूने ऑक्सिजनचा पुरवठा होतो. या दोन्ही वायूंच्या रासायनिक अभिक्रियेतून मोठ्या प्रमाणावर विजेची निर्मिती होते, ज्यावर ही ट्रेन धावते. विशेष म्हणजे या प्रक्रियेत उपउत्पादन (बाय-प्रॉडक्ट) म्हणून केवळ पाण्याची वाफ आणि पाणी बाहेर पडते, जे वातावरणात सोडले जाते. यामुळे या ट्रेनमधून कोणतेही विषारी वायू किंवा धूर उत्सर्जित होत नसल्याने, ही संपूर्णपणे शून्य-उत्सर्जन (झिरो इमिशन) देणारी आणि निसर्गाचे जतन करणारी देशातील पहिली हरित रेल्वे ठरली आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

६ बॉलवर ६ सिक्स मारणारा 'तो' जादूगार हरपला!

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software