- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- कोल्हापूरमध्ये दोन गटात राडा...जमावाने गाडयांना लावली आग
कोल्हापूरमध्ये दोन गटात राडा...जमावाने गाडयांना लावली आग

कोल्हापूर: राजेबागस्वर फुटबॉल क्लबच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शनिवारी संध्याकाळी सिद्धार्थनगर भागात दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडली. या फुटबॉल क्लबच्या कार्यक्रमादरम्यान दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात किमान १० जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाने किमान सहा वाहनांची तोडफोड केली आणि त्यांना आग लावली. कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजकांनी लावलेल्या बॅनर, पोस्टर्स आणि साउंड सिस्टममुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी पसरली. त्यांनी आपला आक्षेप व्यक्त केला, ज्यामुळे जोरदार वाद निर्माण झाला. लवकरच त्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात हाणामारीत झाले, असे पोलिसांनी सांगितले.
हाती आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हिंसाचार सुरू झाला, दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. कार आणि ऑटोसह काही वाहनांचे नुकसान करण्यात आले आणि त्यांना आग लावण्यात आली. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात पुरेसे पोलिस तैनात करण्यात आले. किमान १०० जणांची नावे नोंदवून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी लोकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांनी शांततेचे आवाहन केल्याचेही त्यांनी सांगितले.