- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईत ‘वंदे मातरम्’चा भव्य सांस्कृतिक सोहळा
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईत ‘वंदे मातरम्’चा भव्य सांस्कृतिक सोहळा
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गिरगाव चौपाटी येथील भारतीय विद्या भवन येथे 'वंदे मातरम्' सांस्कृतिक सोहळा. रसिकांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य.
मुंबई: भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्याग, शौर्य, संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणाऱ्या ऐतिहासिक ‘ऑगस्ट क्रांती दिनाचे’ औचित्य साधून स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘वंदे मातरम्’ या विशेष देशभक्तीपर नृत्य-संगीतमय कलाकृतीचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता गिरगाव चौपाटी जवळील भारतीय विद्या भवन येथे हा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न होणार असून, रसिकांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.
९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी दिलेली ‘चले जाव’ आंदोलनाची हाक ही भारतीय स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक वळण देणारी ठरली होती. या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करत राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ‘वंदे मातरम्’ या नृत्य-संगीतमय कलाकृतीतून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा प्रेरणादायी इतिहास, स्वातंत्र्यवीरांचे अतुलनीय योगदान, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय संस्कृतीचे वैभव अत्यंत प्रभावीपणे सादर केले जाणार आहे. संगीत, नृत्य आणि नाट्यात्मक सादरी करणाच्या या त्रिवेणी संगमातून देशभक्तीचा संदेश थेट रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यात येणार असून, हा कार्यक्रम सर्व वयोगटातील नागरिकांसाठी अतिशय उद्बोधक ठरणार आहे.
अशा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याचा सखोल इतिहास, थोर राष्ट्रनायकांचे कार्य आणि भारतीय संविधानातील राष्ट्रीय मूल्यांची जपणूक नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. हा संपूर्ण कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शक संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यभरात विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि राष्ट्रभावनेचा जागर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सांस्कृतिक कार्य संचालनालया तर्फे सातत्याने केले जात आहे.
मुंबई व परिसरातील सर्व नागरिक, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, तसेच सांस्कृतिक प्रेमी आणि रसिकांनी या प्रेरणादायी देश भक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे खुले आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
