- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- नामांकित बांधकाम व्यावसायिकाला ८ कोटींच्या खंडणीची मागणी; १० लाखांसह त्रिकूट अटकेत
नामांकित बांधकाम व्यावसायिकाला ८ कोटींच्या खंडणीची मागणी; १० लाखांसह त्रिकूट अटकेत
केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून ८ कोटींची खंडणी मागणारे त्रिकूट ठाणे गुन्हे शाखेच्या जाळ्यात. १० लाखांचा हप्ता स्वीकारताना रंगेहात कारवाई.
ठाणे: ठाण्यातील कळवा भागातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायालयीन कारवाईचा धाक दाखवून तब्बल आठ कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने तातडीने सापळा रचून १० लाख रुपयांचा पहिला हप्ता घेणाऱ्या एका त्रिकूटाला रंगेहात अटक केली आहे. संतोष मनोहर बावडेकर (वय ४७), सिद्धेश हरिश्चंद्र बेंडकोळी (३५) आणि इम्तियाज इलियास मोमीन (३१) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे असून, न्यायालयाने त्यांना ७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, कळवा परिसरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाने याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. कळव्यातील केशव हाइट्स या इमारतीच्या मूळ मालकाच्या मृत्यूनंतर झालेल्या नोटरी व्यवहाराच्या कागदपत्रांचा आधार घेत या त्रिकूटाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला विविध केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायालयात कायदेशीर अडकवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली होती. ही खोटी कारवाई थांबवण्यासाठी आणि दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी या आरोपींनी सुरुवातीला साडेचार कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर संपूर्ण प्रकरण कायमचे 'निकाली काढण्यासाठी' आणखी चार कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करत व्यावसायिकाला मानसिक त्रास दिला जात होता.
व्यावसायिकाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेच्या घटक-१चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर व तांत्रिक तपास करत एका सुनियोजित सापळ्याची आखणी केली. त्यानुसार ३० जुलै रोजी कळवा येथील केशव हाइट्स मधील कार्यालयात ठरल्याप्रमाणे पहिला हप्ता म्हणून १० लाख रोख रक्कम स्वीकारत असताना वरील तिन्ही आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले.
न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, या खंडणी रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात आहेत का, तसेच या त्रिकूटाने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर व्यवसायिकांना किंवा नागरिकांना धमकावून खंडणी उकळली आहे का, या दिशेने आता ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस सखोल तपास करत आहेत. या धडक कारवाईमुळे ठाणे वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
