- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- महसूल शिबिरामुळे एक लाख नागरिकांना लाभ: राहुल नार्वेकर
महसूल शिबिरामुळे एक लाख नागरिकांना लाभ: राहुल नार्वेकर
मुंबई शहर जिल्ह्यात महसूल समाधान शिबिरांचा १ लाख नागरिकांनी घेतला लाभ. जिल्हाधिकारी कार्यालयाची ७७९ कोटींची विक्रमी महसूल वसुली.
मुंबई: महसूल विभागाच्या सेवा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ हे शासन आणि जनता यांच्यातील परस्पर संबंध अधिक घट्ट करणारा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेच्याही एक पाऊल पुढे जात नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारी व अर्जांवर थेट समाधानकारक कार्यवाही करण्याचे महत्त्वपूर्ण काम या शिबिरांच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.
मुंबई शहर जिल्ह्यात २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या अभियानांतर्गत अंतिम शिबिराचे आयोजन १८७-कुलाबा विधानसभा मतदारसंघातील रामा आणि सुंदरी वाटूमल सभागृह, के. सी. महाविद्यालय, चर्चगेट येथे पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महसूल प्रशासनाच्या कार्याचा गौरव केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर रयतेसाठीचा संघर्ष, न्याय आणि हक्कांसाठी त्यांनी केलेले ऐतिहासिक कार्य डोळ्यांसमोर उभे राहते, असे सांगत नार्वेकर म्हणाले की, छत्रपतींच्या विचारांवर आधारित एक सक्षम आणि पारदर्शक महसूल व्यवस्था निर्माण करण्याचे काम सध्या शासन करीत आहे. महसूल विभाग हा शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या विभागांपैकी एक असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी त्याचा थेट संबंध येतो. मालमत्ता नोंदणीपासून ते दुष्काळ किंवा पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तातडीने पंचनामे करण्यापर्यंत अनेक महत्त्वाची आणि जबाबदारीची कामे महसूल विभागामार्फत पार पाडली जातात. कुलाबा मतदारसंघात विविध स्तरांतील नागरिक वास्तव्यास असून, प्रत्येक नागरिकाला शासकीय सेवा सहज व पारदर्शकपणे मिळणे गरजेचे आहे. या शिबिरांमुळे नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचत असून अनेक सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी कार्यक्रमात माहिती देताना सांगितले की, २२ जुलैपासून सुरू झालेल्या या विधानसभा मतदारसंघनिहाय अभियानादरम्यान सुमारे एक लाख नागरिकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचता आले आहे. महसूल दिनाचे औचित्य साधून या अभियानाची सांगता करण्यात आली असून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला यश आले आहे. एप्रिल ते जून या कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख नागरिकांना विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले आहेत.
१ ऑगस्ट महसूल दिनानिमित्त मागील वर्षाचा लेखाजोखा मांडताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्याला ४९० कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे तब्बल ७७९ कोटी रुपयांची महसूल वसुली करण्यात आली असून निर्धारित उद्दिष्टाच्या १६० टक्के कामगिरी जिल्ह्याने गाठली आहे. गेल्या वर्षभरात प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी संगणकीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे, जेणेकरून नागरिकांना कार्यालयांमध्ये वारंवार चकरा मारण्याची आवश्यकता भासू नये.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रमात एका विशेष टपाल आवरणाचे अनावरण करण्यात आले. भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून या ऐतिहासिक टप्प्याची नोंद करण्यात आली आहे. जीपीओ संचालिका रेखा रिजवी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयाने गेल्या शतकभरात लोकाभिमुख प्रशासनाची उत्कृष्ट परंपरा जपली असून हे विशेष टपाल आवरण आगामी पिढ्यांसाठी आणि संशोधकांसाठी ऐतिहासिक आठवण ठरेल. शतकभराच्या या वाटचालीत महसूल प्रशासनाने नागरिकांना सेवा देण्यापासून ते आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावण्यापर्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
