इचलकरंजीत आयुक्तांच्या बदलीवरून भाजपमधील संघर्ष शिगेला; आवाडे-हाळवणकर गट आमनेसामने

इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या बदलीवरून भाजपच्या दोन गटांत संघर्ष. आवाडे गट आयुक्तांच्या समर्थनात तर हाळवणकर गट बदलीसाठी आक्रमक.

इचलकरंजी: इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या बदलीच्या मुद्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील दोन दिग्गज नेते, आवाडे गट आणि हाळवणकर गट यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. एका बाजूला आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांच्या बदलीची मागणी करण्यासाठी हाळवणकर गट आक्रमक झाला असताना, दुसऱ्या बाजूने आवाडे गट आयुक्त पाटील यांच्या समर्थनात थेट मैदानात उतरला आहे. आयुक्तांचा कार्यकाळ कायम ठेवावा, यासाठी आवाडे गटाने मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी महापालिकेच्या राजकारणात भाजपमधील आवाडे आणि हाळवणकर गट यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. स्वच्छतेच्या २२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रक मंजुरीच्या विषयावरून हा विवाद प्रथम स्थायी समितीमध्ये आणि नंतर विशेष सभेत चव्हाट्यावर आला होता. प्रशासनाकडून मिळणाऱ्या वागणुकीचा मुद्दा पुढे करत हाळवणकर गटाच्या नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. तसेच, आगामी मंगळवारी (ता. ४) हाळवणकर गट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आयुक्तांच्या बदलीची अधिकृत मागणी करणार असल्याचे समोर आले आहे. या घडामोडींमुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडाली असून, दोन्ही गट आता थेट आमनेसामने आल्याचे चित्र आहे.

हाळवणकर गटाच्या या हालचालींवर प्रतिउत्तर देत आवाडे गटाने आयुक्तांच्या समर्थनार्थ आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार राहुल आवाडे महापालिकेत एका बैठकीनिमित्त आले असताना, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी त्यांच्याकडे अधिकृत पत्र सुपूर्द केले. या पत्रात आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उत्कृष्ट कार्यकौशल्यामुळे शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती मिळाली असल्याचे नमूद करत, त्यांचा कार्यकाळ तसाच कायम ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी लवकरात लवकर वेळ निश्चित करून द्यावी, अशी विनंतीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी महापौर उदय धातुंडे, नगरसेवक राजू बोंद्र, सुशांत कलागते, योगेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी आपल्या पत्रात विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. काही सदस्य स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी प्रशासनाला विनाकारण दोष देत असून, त्यातून विकासकामांची दिशाभूल करणारी खोटी माहिती समाजमाध्यमांवर पसरवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आयुक्तांच्या शिस्तप्रिय व धडक कार्यपद्धतीला 'दंडेलशाही' असे संबोधून केवळ राजकारणासाठी त्यांच्या बदलीचा घाट घातला जात असल्याचा दावाही त्यांनी केला, जरी यादरम्यान कोणाचेही थेट नाव घेणे टाळण्यात आले असले तरी याचा रोख स्पष्ट मानला जात आहे. या परस्परविरोधी भूमिकेमुळे आगामी काळात इचलकरंजी महापालिकेतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

महसूल शिबिरामुळे एक लाख नागरिकांना लाभ: राहुल नार्वेकर

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software