- Hindi News
- देश
- मध्यपूर्वेतील तणावावर भारताची आक्रमक भूमिका; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी इराणला स्पष्टच सुनावले
मध्यपूर्वेतील तणावावर भारताची आक्रमक भूमिका; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी इराणला स्पष्टच सुनावले
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सागरी सुरक्षेवर भारताची कडक भूमिका.
नवी दिल्ली: मध्यपूर्वेमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अत्यंत कडक आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली असून, या संभाषणादरम्यान व्यापारी जहाजे आणि खलाशांना लक्ष्य करण्याच्या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त करत इराणला खडे बोल सुनावले आहेत. कोणत्याही परिस्थितीत व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले भारताला मान्य नसून, अशा कृत्यांचा भारत कठोर शब्दांत निषेध करतो, असा सज्जड दम त्यांनी भरला आहे.
या महत्त्वाच्या टेलीफोनिक चर्चेनंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "आज संध्याकाळी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा झाली. या प्रदेशातील वाढत्या तणावाबाबत भारताची चिंता मी व्यक्त केली. व्यापारी जहाज आणि खलाशांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत टाळले गेले पाहिजेत. अशा प्रकारच्या कोणत्याही हल्ल्यांचा भारत कठोर शब्दांत निषेध करतो." यादरम्यान, सध्याच्या या भीषण संघर्षावर तोडगा काढण्यासाठी युद्ध किंवा हिंसाचार नव्हे, तर केवळ संवाद आणि राजनैतिक (कूटनीतिक) मार्ग हाच एकमेव सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.
चर्चेदरम्यान इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सध्या सुरू असलेल्या घडामोडींविषयी आणि प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणची भूमिका व राजनैतिक चर्चांची माहिती दिली, असे जयशंकर यांनी नमूद केले. भारताने जागतिक स्तरावर नेहमीच शांततेचे समर्थन केले असून, सर्व संबंधित देशांनी आणि पक्षांनी टोकाची भूमिका न घेता जास्तीत जास्त संयम बाळगावा आणि शांततापूर्ण मार्ग स्वीकारावा, अशी भारताची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी झालेल्या या चर्चेच्या अवघ्या एक दिवस आधी, एस. जयशंकर यांनी ब्लॅक सी (काळा समुद्र) परिसरातील व्यापारी जहाजे आणि त्यावर कार्यरत असलेल्या भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्री सिबिहा यांच्याशीही गंभीर चर्चा केली होती. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या विविध प्रादेशिक संघर्षांच्या काळात आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरची वाहतूक पूर्णपणे सुरक्षित राहणे आणि प्रत्येक संकटावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघणे भारताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याचा आग्रह भारताने सातत्याने धरला आहे. या ताज्या घडामोडींमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणातील आक्रमक आणि शांततावादी दोन्ही बाजू पुन्हा एकदा जगासमोर आल्या आहेत.
