रक्षा खडसे आक्षेपार्ह भाषा प्रकरण; विजय चौधरींच्या पीएला पुण्यातून अटक

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेप्रकरणी पहिली कारवाई. विजय चौधरी यांचा पीए यश टिपरे पुण्यातून ताब्यात.

जळगाव: भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी चर्चेत आलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला आता मोठे कायदेशीर वळण मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली असून, भाजप नेते विजय चौधरी यांचे स्वीय सहायक (PA) यश टिपरे याला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाशी जोडलेली एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा दावा केला गेला. विशेष म्हणजे, पक्षातीलच एका महिला नेत्याबद्दल अशा प्रकारे बोलले जात असताना मंत्री गिरीश महाजन यांनी रोखले नाही, असा आरोप यातून करण्यात आला. याशिवाय, विजय चौधरी यांच्या इतरही काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या असून, त्यात इतर नेत्यांबाबतही भाष्य करण्यात आल्याचे समोर आले होते.

आपल्या वडिलांच्या नावाने कथित ऑडिओ क्लिप्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्यामुळे विजय चौधरी यांच्या मुलाने या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे तपास चक्र वेगाने फिरवण्यात आली. तपासादरम्यान, विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा त्यांच्याच स्वीय सहाय्यक (PA) यश टिपरे याने एका पेन ड्राईव्हमध्ये घेतला असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या संशयावरून पोलिसांनी पुण्यातून यश टिपरे याला ताब्यात घेतले असून, त्याला आता न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सध्या नंदुरबार पोलीस आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाच्या मूळाशी जाण्यासाठी कसून चौकशी करत आहेत. ही वादग्रस्त ऑडिओ क्लिप नेमकी कुणाकुणाला फॉरवर्ड करण्यात आली होती आणि ती व्हायरल करण्यामागे नेमकी कोणा-कोणाची साखळी सक्रिय होती, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर असून, सायबर गुन्हे शाखेच्या माध्यमातून तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या आणि बदनामीकारक ऑडिओ क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

महसूल शिबिरामुळे एक लाख नागरिकांना लाभ: राहुल नार्वेकर

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software