दौंडमध्ये तरुणीचे अपहरण: माजी नगराध्यक्ष बादशहा शेखसह ११ जणांवर गुन्हे दाखल

दौंडमध्ये पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण. वादग्रस्त माजी नगराध्यक्ष बादशहा शेखसह ११ जणांवर ॲट्रॉसिटी, BNS आणि Arms Act अंतर्गत गुन्हे.

दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. दौंड नगरपालिकेचा वादग्रस्त माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्यासह एकूण ११ जणांवर एका तरुणीचे मध्यरात्री अपहरण केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून घरात घुसणे, आईवर हल्ला करणे, रोकड व सोनसाखळी लुटणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि तरुणीचे बळजबरीने अपहरण करून कारमधून पसार होणे, अशा अतिउग्र कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, २८ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आरोपी हातात कोयते, तलवारी आणि घातक शस्त्रे घेऊन एका तरुणीच्या घरी बळजबरीने घुसले. आरोपींनी तरुणीच्या आईला बेदम मारहाण केली आणि त्यांच्या डोक्याला थेट पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील कपाटातील रोख रक्कम आणि आईच्या गळ्यातील सोनसाखळी बळजबरीने हिसकावून घेतली. एवढेच नव्हे तर, जातीवाचक शिवीगाळ करत त्या तरुणीला जबरदस्तीने उचलून नेले आणि एका पांढऱ्या रंगाच्या हुंडई वेर्ना (Hyundai Verna) कारमध्ये डांबून तेथून पळ काढला.

याप्रकरणी फिर्यादीनुसार, तरुणीच्या आईच्या डोक्याला पिस्तूल लावणारा नदीम अन्वर शेख (रा. कुंभार गल्ली, दौंड) याच्यासह माजी नगराध्यक्ष बादशहा आदम शेख (रा. कुंभार गल्ली, दौंड), शफीक मुलाणी (रा. मळद), इरफान उर्फ वसीम अन्वर शेख, फैजल मेहफूज काझी, अशपाक समीर शेख, आफताब समीर शेख, आरबाज अन्वर शेख आणि इतर तीन अनोळखी व्यक्ती अशा एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व ११ संशयित आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी), शस्त्र अधिनियम (Arms Act) तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमांनुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात अपहरण (कलम १४०), दरोडा टाकणे (कलम ३१०), गृह अतिक्रमण (कलम ३३२), जीवे मारण्याची धमकी व धाकदपटशा (कलम ३५१) आणि विनयभंग (कलम ७४) यांचा समावेश आहे. दौंड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक बापूराव दडस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

माजी नगराध्यक्ष आणि दौंड बाजार समितीचा माजी संचालक असलेला बादशहा शेख हा आधीपासूनच अनेक गंभीर गुन्ह्यांमुळे वादग्रस्त ठरला आहे. २० ऑक्टोबर २०२२ रोजी एका तरुणीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल होता. तसेच, त्याचा मुलगा वसीम शेख याला एका बलात्कार प्रकरणात सहकार्य केल्याप्रकरणी ८ डिसेंबर २०२२ रोजी बादशहा शेखसह सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. याशिवाय, २७ जून २०२५ रोजी दौंड पोलीस ठाण्यासमोर जाहीर भाषणात अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे तसेच जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी २८ जून २०२५ रोजी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या ताज्या अपहरण प्रकरणातील गंभीर गुन्ह्यांमुळे बादशहा शेख याच्या भोवतीचा पाश आणखी आवळला गेला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

महसूल शिबिरामुळे एक लाख नागरिकांना लाभ: राहुल नार्वेकर

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software