शेतीत तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करा; शेतकऱ्यांना फडणवीसांचा संदेश

नाशिकमधील दिंडोरीत कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. शेतीत AI तंत्रज्ञान व 'महाविस्तार ॲप' वापरण्याचे आवाहन.

नाशिक: राज्यातील बळीराजाला केवळ तात्पुरती कर्जमुक्ती देऊन चालणार नाही, तर त्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून कायमचे बाहेर काढण्यासाठी शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, नवे संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) मोठ्या प्रमाणावर वापर करण्याची गरज आहे. शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यासाठी राज्यातील कृषी महाविद्यालयांनी अत्यंत महत्त्वाची आणि मार्गदर्शक भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचडगाव येथील ‘कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालया’च्या नूतन भव्य इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

        मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या या महत्त्वाकांक्षी शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटन सोहळ्याला जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक असून त्यांची आर्थिक गुंतवणूक करण्याची क्षमता अत्यंत मर्यादित असल्याचे वास्तव मांडले. दिवसेंदिवस वाढणारा शेतीचा उत्पादनखर्च आणि त्या तुलनेत हमीभावामुळे मिळणारा सीमित लाभ या कात्रीत शेतकरी सापडला असून, यातून मार्ग काढण्यासाठी शेती क्षेत्रातील संशोधनाला गती देणे आणि ते संशोधन थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची उरलीसुरली क्षमताही कमी होत चालल्याबद्दल चिंता व्यक्त करत, कृषी महाविद्यालयांनी मातीचा पोत ओळखून खतांच्या शास्त्रीय वापराबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

         कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर झाल्यास घडून येणाऱ्या बदलांची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर केल्यास उत्पादन खर्च तब्बल २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकतो आणि उत्पादकता ४० टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकते. याच उद्देशाची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने देशात प्रथमच नाविन्यपूर्ण पाऊल उचलत ‘महाविस्तार ॲप’ विकसित केले आहे. या आधुनिक ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण पीक साखळीचे मार्गदर्शन अगदी सोप्या भाषेत आणि हव्या त्या भाषेत उपलब्ध होत असल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिक जिल्ह्याचा कृषी क्षेत्रातील दबदबा अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, देशामधील एकूण द्राक्ष निर्याती पैकी तब्बल ८० टक्के निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून होते आणि येथील कांदा संपूर्ण देशभरात स्वतःची वेगळी ओळख राखून आहे. नाशिकच्या जडणघडणीत आणि शैक्षणिक प्रगतीत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा मोलाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या विशेष कार्यक्रमा दरम्यान संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचा निधीचा धनादेश मुख्यमंत्री महोदयांकडे सूपूर्त करण्यात आला.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले तर संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी मनोगतातून संस्थेच्या गौरवशाली वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हवामान बदलामुळे शेतीसमोर रोजच उभी ठाकलेली नवी आव्हाने लक्षात घेता विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कृषी क्षेत्र आणि संबंधित उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणारा हुशार विद्यार्थी आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारा शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ घडवण्याचे मोठे दायित्व कृषी महाविद्यालयांवर आहे, असे त्यांनी सांगितले. या नूतन संकुलामध्ये महाविद्यालयाची मुख्य इमारत, तसेच मुला व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहांच्या सर्व समावेशक व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थित सर्व मंत्र्यांनी व पाहुण्यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांच्यासह अनेक आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्थेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होता.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई

Latest News

साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई
साताऱ्यात गणेशोत्सवात 'पेपर ब्लास्ट'मुळे पसरणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यावर पालिकेची कारवाई. १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आणि विशेष पथके तैनात.
ध्वनिप्रदूषण रोखण्यात अपयशाचा आरोप; पुणे पोलिस आयुक्तां विरोधात अवमान याचिका
ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले; विजय वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंना इशारा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण; नाशिकच्या वाहतुकीला नवी दिशा
तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर खड्डे बुजविण्याची धडक मोहीम सुरू

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software