पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; दोन परदेशी नागरिकांसह तिघे अटकेत

पुण्यात ANTF कडून एमडी ड्रग्स तस्करांवर मोठी कारवाई. सेनेगल व इस्वातिनीच्या २ नागरिकांसह ३ जणांना अटक; मेफेड्रोन व लॅपटॉप जप्त.

पुणे: पुण्यातील अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाने (ANTF) अधिक आक्रमक भूमिका घेत एका मोठ्या गुन्ह्याचा यशस्वी पर्दाफाश केला आहे. बाणेर पोलीस ठाण्यात यापूर्वी नोंद असलेल्या एमडी विक्री प्रकरणाचा सखोल तपास करत पथकाने दोन परदेशी नागरिकांसह एकूण तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे ड्रग्स तस्करीच्या आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक जाळ्याची पाळेमुळे उखडून टाकण्याच्या दिशेने पोलिसांना मोठे यश मिळाले असून, आरोपींकडून महागडे इलेक्ट्रॉनिक साहित्य व लाखो रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले आहे.

      बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर क्रमांक २०१/२०२६ अंतर्गत गत २६ जून २०२६ रोजी सुमारे ९८ ग्रॅम एमडी जप्त करून तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासा दरम्यान मिळालेल्या धाग्या दोऱ्यांवरून आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या दोन महिन्यांपासून या रॅकेटचा कसून माग काढला. आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचे जाळे आणि अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा (सप्लाय चेन) सखोल मागोवा घेतल्यानंतर पथक या प्रकरणातील आणखी तीन मुख्य आरोपींपर्यंत पोहोचले. त्यानुसार सापळा रचून विक्रम कालेकर (वय ३०, रा. कर्जत, जि. रायगड), सिसे सादिओ ऊर्फ अ‍ॅलेक्स (वय ३०, सेनेगलचा नागरिक, सध्या रा. डोंबिवली, जि. ठाणे) आणि जेले बियासमार्क (वय ३०, किंगडम ऑफ इस्वातिनीचा नागरिक, सध्या रा. कर्जत, जि. रायगड) यांना अटक करण्यात आली.

       अटक करण्यात आलेल्या परदेशी तस्करांच्या कसून चौकशी दरम्यान त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. सिसे सादिओ ऊर्फ अ‍ॅलेक्स याच्या ताब्यातून तब्बल २२ ग्रॅम एमडी, आठ मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे, ज्यामुळे या तस्करांचे अनेक डिजिटल आणि व्यावसायिक संपर्क पोलिसांच्या हाती लागले आहेत. दुसरीकडे, जेले बियासमार्क याच्याकडून १४ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय तस्करांचे स्थानिक स्तरावर वितरणाचे जाळे नेमके कुठे-कुठे पसरले आहे आणि त्यांच्या पाठीमागे आणखी कोणकोण मोठे म्होरके सक्रिय आहेत, याचा सखोल शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे. तसेच या गुन्ह्यातील आर्थिक व्यवहारांचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे तपासण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.

       केंद्र सरकारच्या २०२९ पर्यंतच्या ‘नशामुक्त भारत’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला अनुसरून आणि राज्यातील बेकायदेशीर अंमली पदार्थांची तस्करी पूर्णपणे रोखण्याच्या स्पष्ट निर्देशा नुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे शहरात ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. या सक्त कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, समाज विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात किंवा परिसरामध्ये अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवना संदर्भात कोणतीही संशयास्पद माहिती किंवा पुरावा मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित यंत्रणेला याची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून, माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि सर्व तपशील पूर्णपणे गोपनीय ठेवले जातील, अशी हमी पोलिसांनी दिली आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई

Latest News

साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई
साताऱ्यात गणेशोत्सवात 'पेपर ब्लास्ट'मुळे पसरणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यावर पालिकेची कारवाई. १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आणि विशेष पथके तैनात.
ध्वनिप्रदूषण रोखण्यात अपयशाचा आरोप; पुणे पोलिस आयुक्तां विरोधात अवमान याचिका
ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले; विजय वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंना इशारा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण; नाशिकच्या वाहतुकीला नवी दिशा
तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर खड्डे बुजविण्याची धडक मोहीम सुरू

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software