- Hindi News
- पुणे
- भारती विद्यापीठ पोलिसांचा मोठा कारवाईचा धडाका; ३ गावठी कट्ट्यांसह दोघे अटकेत
भारती विद्यापीठ पोलिसांचा मोठा कारवाईचा धडाका; ३ गावठी कट्ट्यांसह दोघे अटकेत
पुण्यात भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज व आंबेगाव परिसरात कारवाई करत ३ गावठी बनावटीचे कट्टे व ४ काडतुसांसह २ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या.
पुणे: शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात आपली मोहीम अधिक आक्रमक केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धडक कारवायांमध्ये रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. या यशस्वी कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि चार जिवंत काडतुसे असा घातक शस्त्रसाठा हस्तगत केला असून, या तडाख्यामुळे पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, कात्रज डेअरी चौक ते सरहद् चौक दरम्यानच्या परिसरात एक तरुण बेकायदेशीरपणे हत्यार बाळगून उभा असल्याची गोपनीय माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अंमलदारांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कात्रज डेअरीच्या भिंतीजवळ थांबलेल्या शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६, रा. श्री गणेश निवास, आंबेगाव पठार) याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी बनावटीचे कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी त्याच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अर्थात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पूर्वी पासूनच पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दुसऱ्या एका कारवाईत, पोलीस पथक हद्दीत गस्त घाालत असताना साई सिद्धी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ परिसरातील एका कोचिंग क्लासेस समोरील गल्लीत एक संशयित तरुण पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी सतर्कता दाखवत ओंकार ऊर्फ बब्या संतोष पवार (वय १८, रा. तापकीर चाळ, आंबेगाव पठार) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. हा तरुणही सराईत गुन्हेगार असून त्याच्यावरही आर्म ॲक्टनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या समाज विघातक घटकांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही संपूर्ण यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवी जाधव, तसेच पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सोहम शेंडकर, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मल्लिकार्जुन कोळी आणि कृष्णा म्हस्के यांच्या पथकाने अत्यंत सांघिक कौशल्याने पार पाडली आहे.
