- Hindi News
- पुणे
- पेपरफुटी आणि बेरोजगारीवरून राष्ट्रवादी आक्रमक; पुण्यात तिरंगा दुचाकी रॅली
पेपरफुटी आणि बेरोजगारीवरून राष्ट्रवादी आक्रमक; पुण्यात तिरंगा दुचाकी रॅली
पुण्यात पेपरफुटी आणि वाढत्या बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची (शरदचंद्र पवार) भव्य तिरंगा दुचाकी रॅली. चाकण मधील उद्योगांचे स्थलांतर रोखण्याची मागणी.
पुणे: राज्यातील वाढती बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीचे सत्र, परीक्षांमधील गैरप्रकार आणि लाखो तरुणांच्या अंधकारमय भविष्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने पुण्यात रविवारी एक भव्य ‘बेरोजगार हक्क एल्गार तिरंगा टू-व्हीलर रॅली’ काढण्यात आली. शिवाजीनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालया पासून सुरू झालेली ही रॅली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. हातात तिरंगा झेंडा आणि शिक्षण, रोजगार व पारदर्शक परीक्षा व्यवस्थेच्या मागण्यांचे फलक झळकावत शेकडो तरुणांनी या रॅलीत सहभाग घेतला, ज्यामुळे पुणे शहरात काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.
पुणे शहर पूर्व विभागाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील आणि पश्चिम विभागाचे अध्यक्ष विशाल तांबे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली व आयोजना खाली ही रॅली पार पडली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, पुणे महानगरपालिकेतील गटनेते काका चव्हाण, नगरसेविका अनिता इंगळे यांच्यासह पक्षाचे अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने तरुण-तरुणी उपस्थित होते. रॅलीच्या समारोपा प्रसंगी बोलताना नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. परीक्षांमधील वारंवार होणारे गैरप्रकार आणि रोजगाराच्या वाढत्या अभावामुळे देशाचा तरुण वर्ग नैराश्याच्या गर्तेत जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना नेत्यांनी गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकला. काही महिन्यांपूर्वी देशभरात गाजलेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा संदर्भ देत, या परीक्षेला बसलेल्या सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कसा खेळ झाला, याची आठवण करून देण्यात आली. या पेपरफुटी प्रकरणामुळे आणि मानसिक तणावामुळे अनेक विद्यार्थ्यांनी टोकाची पावले उचलून आत्महत्या केल्याचा दावा करत नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थी आणि पालकांच्या तीव्र आंदोलना नंतर सरकारला काही अंशी पावले उचलावी लागली असली, तरी पेपरफुटीचा हा प्रश्न अजूनही कायम असून त्यासोबतच भीषण बेरोजगारीचा लढा तरुणांसमोर उभा ठाकला आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
या आंदोलनात केवळ परीक्षा पुरतीच नव्हे, तर औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारीचा मुद्दाही प्रखरतेने मांडण्यात आला. पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील सुमारे २० प्रमुख उद्योग इतरत्र स्थलांतरित होण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर दावा यावेळी करण्यात आला. हे उद्योग जर महाराष्ट्रा बाहेर गेले, तर चाकण आणि परिसरातील हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर रूप धारण करू शकतो. त्यामुळे या उद्योगांना कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातच टिकवून ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने ठोस आणि परिणामकारक पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी करण्यात आली. रोजगार निर्मिती सोबतच सध्या उपलब्ध असलेले रोजगार टिकवून ठेवणे ही देखील सरकारची नैतिक जबाबदारी असल्याचे नेत्यांनीण सुनावले.
लाखो विद्यार्थी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, दिवस-रात्र मेहनत करून आणि पालकांची कष्टाची कमाई खर्च करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, परीक्षा प्रक्रियेतील ढिसाळ कारभार, पेपरफुटी आणि अनियमितते मुळे या विद्यार्थ्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते, असे सांगत परीक्षा व्यवस्थेवरील तरुणांचा विश्वास ढळू देऊ नका, असे आवाहन करण्यात आले. दिल्लीमध्ये आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केल्याच्या घटनेचा निषेध करत, लोकशाहीत आवाज उठवणाऱ्या तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकार कायम स्वरूपी रोखण्यासाठी सरकारने एक कठोर, पारदर्शक आणि वेधक यंत्रणा उभी करावी, अशी मुख्य मागणी या रॅलीतून करण्यात आली. प्रश्नपत्रिका छापाईपासून ते परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवेपर्यंतच्या संपूर्ण साखळीत अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असावी आणि यात दोषी आढळणारी कोणतीही व्यक्ती कितीही प्रभावशाली असली, तरी तिच्यावर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. "शिक्षण, रोजगार आणि पारदर्शक परीक्षा हा आमचा हक्क आहे," असा निर्धार व्यक्त करत, शासनाने या रॅलीची तातडीने दखल घेऊन बेरोजगार तरुणांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, तर आगामी काळात संपूर्ण राज्यभर याहून अधिक तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा कडक इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारला देण्यात आला.
