- Hindi News
- पुणे
- हिंजवडीतील इंटरनॅशनल स्कुलला बॉम्बने उडवण्याची धमकी
हिंजवडीतील इंटरनॅशनल स्कुलला बॉम्बने उडवण्याची धमकी
पुणे: दिल्लीच्या लाल किल्ला येथे झालेल्या कारच्या स्फोटानंतर प्रशासनाच्या तपासाला गती आली. त्यानंतर अनेक राज्यातील महत्वाची ठिकाणे, मंदिरे यांना देखील संरक्षण देण्यात आले आहे. यातच आता पुण्यातील हिंजवडी येथील एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शाळेला बुधवारी बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अधिकाऱ्यांनी संबंधित परिसर रिकामा केला व शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. इमेल मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिस आणि बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने (बीडीडीएस) कॅम्पसमध्ये व्यापक शोध मोहीम सुरू केली आहे.
हिंजवडी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी सकाळी शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेच्या परिसरात बॉम्बस्फोटाची चेतावणी देणारा ईमेल मिळाला. त्यानंतर शाळेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. हिंजवडी पोलिस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले, "ईमेलमधील मजकुराची तपासणी करण्यात आली आणि बीडीडीएसने सखोल शोध सुरू केला आहे. चौकशीचा भाग म्हणून ईमेलचा स्रोत देखील तपासला जात आहे."
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "शाळेत प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे ही जागा ताबडतोब रिकामी करता येऊ शकते. श्वान पथकासह बीडीडीएस पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत आणि आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही."मेल मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या इतर युनिट्स आणि बीडीडीएसच्या पथकांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली.
