- Hindi News
- सातारा
- वावरहिरेकरांना फुटलेल्या पाईपलाईनचे दूषित पाणी; नागरिकांमधून ग्रामपंचायतीविरोधात उद्रेकाची शक्यता
वावरहिरेकरांना फुटलेल्या पाईपलाईनचे दूषित पाणी; नागरिकांमधून ग्रामपंचायतीविरोधात उद्रेकाची शक्यता
दहिवडी: वावरहिरे (ता. माण) येथील पाणीपुरवठा अनेक दिवसांपासून बंद आहे. जवळपास तीस दिवसापासून नळांना पाण्याचा थेंबही न आल्याने नागरिकांवर फुटलेल्या पाईपलाईनमधून वाहणारे दूषित पाणी भरून आणण्याची वेळ आली आहे. मुख्य पाईपलाईन फुटल्यानंतर वाहणारे दूषित पाणी स्थानिकांची जीवनरेषा ठरत असल्याने गावामध्ये उद्विग्न परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रवाहित पाण्यात गावात मोकाट फिरणारी जनावरे वावरतात, त्यात पाणी पितात आणि नाचून जातात. त्यामुळे ते पाणी अत्यंत अस्वच्छ असून आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना वावरहिरेकरांना याच्या माध्यमातून करावा लागण्याची चिंता व्यक्त होत आहे.
या संदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायत तसेच संबंधित प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्याप पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यानच्या काळात पाणीपुरवठ्यातील अडथळा दूर करण्यासाठी दोन - अडीच हजार रुपये खर्च करून नवीन पाईप बसवली असली तरी नळाला पाणी अद्याप आले नाही. पाईपलाईन फुटून शुद्ध पाणी उपलब्ध होत नसल्याने त्वचारोग, पचनाचे त्रास, पाण्यावरील आजारांचे संकट मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत तर ग्रामस्थांमधून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
