महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करू- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे: क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना देण्यात येणाऱ्या प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित क्रीडा पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाहक प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाहक प्रा. निवेदिता एकबोटे, सचिव प्रा. शामाकांत देशमुख, न्यु मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, डॉ.विक्रम फाले, प्रा. दिपक कुटे,  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. 

       आयुष्यात यश मिळविण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती ठेवून ध्येयाने प्रेरित होत वाटचाल करा असा सल्ला विद्यार्थ्यांना देऊन मंत्री  भरणे यावेळी म्हणाले, नेहमी धाडस करून नवनवीन वाटा शोधल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करावे. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीची आदरपूर्वक सेवा करावी. आयुष्यात मोठ्यामोठ्या संधी उपलब्ध होतात, त्या संधीचे सोने करा. अहंकार बाजूला जीवनात नेहमी आनंदी रहा, असेही मार्गदर्शन त्यांनी केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर राहिला आहे. त्यामुळे या संस्थेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी कुतुहल राहिले आहे, असेही  भरणे म्हणाले. 

       जाधव म्हणाले, खेळामुळे खेळाडूंच्या अंगी संघर्ष करण्याची स्वयंशिस्त लागते. खेळाडूंकरिता प्रामाणिकपणा, संयम, आत्मविश्वास महत्वाचा आहे. खेळात निराश होऊ नका, नेहमी मोठी स्वप्ने पाहा, संधीचे सोने करा, कष्ट करत राहा, एक दिवस निश्चित यश मिळेल, असेही ते म्हणाले. क्रीडा क्षेत्राला योगदान देण्याकरिता महाविद्यालयात खेळाडू कोट्याकरिता आरक्षित जागेवरच खेळाडूंना प्रवेश मिळावा, जागा रिक्त राहणार नाही याकरीता नियमात बदल होणे आवश्यक आहे. शालेय जीवनापासून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिल्यास राज्य, देशाचे नाव उज्ज्वल होण्यास मदत होईल, अशी सूचना करून आगामी काळात खेळाडूंच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच काम करीत राहील, असेही जाधव म्हणाले. 

        डॉ. एकबोटे म्हणाले, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याच्यादृष्टीने नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन आहे. दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. क्रीडापटू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या क्षेत्रातही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा असून क्रीडा क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून भरीव योगदान देण्याकरिता संस्थेने प्रयत्नशील रहावे, असेही डॉ. एकबोटे म्हणाले. डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या, महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्याअंगी असलेल्या कला, क्रीडा, सांस्कृतिक गुणांना वाव प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षणासोबतच क्रीडा, कलाविषयक आदी स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेच्यामाध्यमातून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्याकरिता संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे, असे डॉ. एकबोटे म्हणाल्या.  यावेळी प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवरच केला चौघांनी हल्ला; खडकी परिसरात नेमकं काय घडलं?

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software