- Hindi News
- पुणे
- "दादा, मला माफ करा..."; रुपाली पाटलांच्या 'त्या' फेसबुक पोस्टने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ प...
"दादा, मला माफ करा..."; रुपाली पाटलांच्या 'त्या' फेसबुक पोस्टने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ पुणे:
पुणे:
महाराष्ट्रातील वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका बड्या महिला नेत्यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाच्या आक्रमक नेत्या रुपाली पाटील ठोंबरे कमालीच्या नाराज असल्याचे समोर आले असून, त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका अत्यंत सूचक फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'लवकरच मोठा आणि कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे,' असे विधान करत त्यांनी पक्ष सोडण्याचे थेट संकेत दिल्याने अजित पवार यांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोडी आणि दडपशाहीला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या पोस्टवरून स्पष्ट होत आहे.
राज्यात एकीकडे शरद पवार यांच्या पक्षाच्या आगामी राजकीय भूमिकांची आणि दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाकडून महत्त्वाच्या खात्यांसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची चर्चा रंगली असतानाच, हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट अजित पवार यांना उद्देशून भावनिक पण तितकीच आक्रमक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी अजित पवारांचा उल्लेख 'बापमाणूस' असा करत, पक्षात पूर्वी कार्यकर्त्यांवर अन्याय करणाऱ्यांवर आणि फुशारकी मारणाऱ्या नेत्यांवर अजितदादांचा वचक होता, अशी आठवण करून दिली. दादांच्या शब्दाचा मान ठेवून आपण आजवर अनेक गोष्टी सहन केल्या आणि शांत राहिलो, असे त्यांनी म्हटले आहे.
मात्र, अजित पवारांच्या अनुपस्थितीत किंवा पक्षात त्यांच्या बदललेल्या भूमिकेनंतर काही नेत्यांनी पक्षातील परिस्थिती अत्यंत भयावह केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या संयमाला काहींनी हतबलता किंवा कमकुवतपणा समजण्याची चूक केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता यापुढे कोणताही अन्याय, दडपशाही आणि विश्वासघात सहन केला जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी अजित पवारांची जाहीर माफी मागितली आहे. 'आता दुर्गाकाली रूप धारण करावे लागणार असून कठोर भूमिका घ्यावी लागेल,' असे म्हणत त्यांनी थेट बंड पुकारण्याचे संकेत दिले आहेत.
पक्षातील निष्ठावंतांना सध्याची घुसमट जाणवत असल्याचा दावा करत त्यांनी राजकारण गढूळ करणाऱ्यांना आणि अन्याय करणाऱ्यांना सोडणार नाही, असा स्पष्ट शब्द दिला आहे. आपण अजित पवारांची माणसे होतो आणि राहू, पण पक्षातील सध्याच्या कार्यपद्धतीविरोधात लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रुपाली पाटील यांच्या या भूमिकेमुळे त्या पक्षाला रामराम ठोकणार की पक्षात राहूनच अंतर्गत नेत्यांविरोधात संघर्ष करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या संभाव्य पावलामुळे पुणे आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत समीकरणांना मोठा फटका बसू शकतो.
