दहीवडी हादरली! मेडिकल व्यावसायिकाच्या बंगल्यातून पावणे नऊ लाखांची चोरी

दहीवडी:

 माण तालुक्यातील दहीवडी शहरात एक अत्यंत धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. दहीवडी-मायणी रस्त्यावरील एका नामांकित मेडिकल व्यावसायिकाच्या बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोकडसह लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. यामध्ये एकूण ८ लाख ९२ हजार ९०० रुपयांच्या ऐवजावर चोरांनी डल्ला मारला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दहीवडी पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र गणपत मोरे (वय ४४, रा. मोरेमळा, सिताराम पॅलेस, मायणी रोड, दहीवडी) यांचे दहीवडी आणि वडूज भागात मेडिकलचे दुकान आहे. १६ जुलै रोजी रात्री नेहमीप्रमाणे मोरे कुटुंब जेवण करून बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले होते. रात्री गाढ झोपेत असल्याचा गैरफायदा घेत मध्यरात्री ते १७ जुलैच्या पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या 'सिताराम पॅलेस' या बंगल्याला लक्ष्य केले. चोरट्यांनी बंगल्याच्या दक्षिण बाजूला असलेल्या लोखंडी दरवाजाचे कुलूप अज्ञात हत्याराच्या साहाय्याने तोडले आणि घरात प्रवेश केला.

घरात घुसलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लहान व मोठ्या तिजोऱ्या कशाच्या तरी साहाय्याने उघडून आतील मुद्देमाल गायब केला. यामध्ये ३ लाख ४१ हजार ९०० रुपयांची रोकड, ज्यामध्ये प्रामुख्याने ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता, ती चोरून नेली. याशिवाय तिजोरीतील जवळपास पावणेचार लाख रुपये किमतीची ५० ग्रॅम सोन्याची साखळी, ४३ ग्रॅमचे दुपदरी सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची बाळी असा सोन्याचा ऐवज लंपास केला. तसेच, देवघरातील व तिजोरीतील ८० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्ती, मुलांचे पैंजण व करदुडे असा १ लाख रुपयांचा चांदीचा मालही चोरून नेला. यासोबतच सोन्याच्या अंगठ्या, कानातील डूल, महागडी स्मार्ट वॉच आणि मेडिकल व्यवसायाचे महत्त्वाचे परवाने व कागदपत्रेही चोरांनी पळवून नेली.

सकाळी मोरे कुटुंबातील सदस्य जागे झाल्यानंतर त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच दक्षिण बाजूचा दरवाजा उघडा आणि कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळल्याने घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरेंद्र मोरे यांनी तातडीने दहीवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेची फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

या धक्कादायक चोरीप्रकरणी दहीवडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५(a) आणि ३३१(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक भाऊसाहेब चंद्रराव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती अचुत धोंगडे करत आहेत. या धाडसी चोरीमुळे दहीवडी परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, चोरट्यांना लवकरात लवकर गजाआड करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

HCL Tech चा गुजरातमध्ये मोठा विस्तार! गिफ्ट सिटीत ग्लोबल टेक सेंटर सुरू; AI तंत्रज्ञानावर देणार भर

Latest News

HCL Tech चा गुजरातमध्ये मोठा विस्तार! गिफ्ट सिटीत ग्लोबल टेक सेंटर सुरू; AI तंत्रज्ञानावर देणार भर HCL Tech चा गुजरातमध्ये मोठा विस्तार! गिफ्ट सिटीत ग्लोबल टेक सेंटर सुरू; AI तंत्रज्ञानावर देणार भर
गांधीनगर: भारतातील अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवठादार कंपनी एचसीएलटेक (HCLTech) ने गुजरातच्या तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी झेप घेतली आहे. कंपनीने...
बलुचिस्तानचा मोठा निर्णय, थेट स्वातंत्र्य घोषित! चीनच्या 'सीपेक' प्रकल्पाचे कंबरडे मोडणार?
देशात प्लास्टिकच्या नोटांचा ट्रायल सुरू; ₹१० आणि ₹२० च्या नोटांसाठी RBI कडून ग्लोबल टेंडर जारी!
"दादा, मला माफ करा..."; रुपाली पाटलांच्या 'त्या' फेसबुक पोस्टने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ पुणे:
मिरज पंचायत समितीत मोठा राजकीय भूकंप; सभापती तन्वी कमलेकर यांची निवड अखेर रद्द!

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software