- Hindi News
- सातारा
- फलटण बोगस दूध रॅकेटचे धागेदोरे बारामतीपर्यंत; सोमनाथ डेअरीचे ११ पदाधिकारी रडारवर
फलटण बोगस दूध रॅकेटचे धागेदोरे बारामतीपर्यंत; सोमनाथ डेअरीचे ११ पदाधिकारी रडारवर
फलटण:
सातारा जिल्ह्यातील होळ (ता. फलटण) येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) उघडकीस आणलेल्या बोगस दूध निर्मिती रॅकेटची व्याप्ती आता अधिक वाढली असून, तपासादरम्यान याचे थेट धागेदोरे शेजारील बारामती तालुक्यापर्यंत पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. होळ येथे रसायन आणि पावडरीचा वापर करून तयार केले जाणारे बनावट दूध बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील 'सोमनाथ डेअरी'कडून संकलित केले जात असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या गंभीर प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलत सोमनाथ डेअरीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांवर थेट कारवाई प्रस्तावित केली असून, या सर्वांना बोगस दूध प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.
या कारवाईच्या चौकशीच्या फेऱ्यात सोमनाथ डेअरीचे चेअरमन सोमनाथ मधुकर होळकर यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य बाळासो मधुकर होळकर, संजय सुभाष होळकर, बाबूराव सखाराम होळकर, सुरेश भाऊसो जाधव, अनिल भाऊसो होळकर, माणिकराव आनंदराव माने, भीमराव मारुती पोटे, दादासो अशोक होळकर, ताईबाई सोमनाथ होळकर आणि सुवर्णा बाळासो होळकर (सर्व रा. लोहारचारी, होळ, ता. बारामती) यांचा समावेश आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यासाठी एफडीएने कायदेशीर पावले उचलली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, सोमनाथ डेअरी गोळा करत असलेले हे बनावट दूध पुढे केरळमधील 'नंदन डेअरी'कडे पाठवले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, त्या दिशेने तपास यंत्रणांनी आपला मोर्चा वळवला आहे.
दुसरीकडे, बोगस दूध तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवणाऱ्या पुरवठादारांवरही प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. होळ येथील रॅकेट चालवणाऱ्या मुख्य आरोपींनी निरा (ता. पुरंदर) येथील व्यापारी मोरे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात व्हे पावडर आणि नॉन-डेअरी क्रीम पावडर खरेदी केल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले आहे. या निष्कर्षाच्या आधारे व्यापारी मोरे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटणमधून सुरू झालेल्या या कारवाईमुळे बनावट आणि भेसळयुक्त दूध निर्मितीची पाळेमुळे संपूर्ण जिल्हाभर आणि परराज्यातही पसरल्याचे उघड झाले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळखोर दूधसम्राटांच्या मुसक्या आवळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात व्यापक आणि तीव्र मोहीम राबवावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे.
