- Hindi News
- पुणे
- घाट सुशोभित, पण महापुरुषांच्या चित्रांकडे दुर्लक्ष; संदीप खर्डेकरांनी प्रशासनाला घेरले
घाट सुशोभित, पण महापुरुषांच्या चित्रांकडे दुर्लक्ष; संदीप खर्डेकरांनी प्रशासनाला घेरले
पुण्यात विसर्जन घाटांच्या सुशोभीकरणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळकांच्या जीर्ण चित्रांकडे दुर्लक्ष. संदीप खर्डेकरांचा पालिकेवर आरोप.
पुणे: गणरायाच्या आगमनाने आणि उत्सवी उत्साहाने अवघे पुणे शहर दुमदुमून गेले असतानाच, प्रशासकीय दिरंगाईचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व विसर्जन घाटांची रंगरंगोटी आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मात्र, एस. एम. जोशी पुलाजवळील श्री यशवंत महाराज विसर्जन घाटावर लावण्यात आलेल्या फलकावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची चित्रे अत्यंत जीर्ण व खराब अवस्थेत असल्याचे उघडकीस आले आहे. या गंभीर प्रकाराबद्दल ‘क्रिएटिव्ह फाउंडेशन’चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त करत, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे तातडीने दखल घेऊन हे चित्र बदलण्याची आग्रही मागणी केली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात दीड दिवसाच्या बाप्पापासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत होणाऱ्या विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेने शहरातील विविध घाटांना नवा लूक दिला आहे. परंतु, एवढी यंत्रणा कार्यरत असताना आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असतानाही, एस. एम. जोशी पुलाजवळील या महत्त्वाच्या विसर्जन घाटावरील फलकावर झळकणारी आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रनायक लोकमान्य टिळक यांची चित्रे धुसर व जीर्ण झाली आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे या गंभीर बाबीकडे झालेले दुर्लक्ष चीड आणणारे असल्याचे खर्डेकर यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी फलक आणि सजावट केली जात असताना, महापुरुषांच्या प्रतिमेच्या सन्मानाचा प्रश्न असणाऱ्या अशा मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणे पुणेकरांच्या भावना दुखावणारे ठरत आहे.
गणेशोत्सवाच्या या पवित्र काळात विसर्जन घाटांवर लाखांच्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत. अशा वेळी प्रशासनाने तातडीने पावले उचलून या जीर्ण झालेली चित्रे बदलणे आणि त्या ठिकाणी नवीन व सन्मानजनक चित्रे बसवणे गरजेचे आहे. जर वेळेत ही दुरुस्ती झाली नाही, तर शिवप्रेमी आणि नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन महापालिका प्रशासन किती तातडीने कार्यवाही करते, याकडे आता संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
