- Hindi News
- पुणे
- टॉर्चच्या उजेडात विद्यार्थ्यांचा अभ्यास, शेतात पिके करपण्याची भीती; पुरंदरमध्ये वीज संकट
टॉर्चच्या उजेडात विद्यार्थ्यांचा अभ्यास, शेतात पिके करपण्याची भीती; पुरंदरमध्ये वीज संकट
पुरंदर तालुक्यात इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे भीषण वीज संकट. टॉर्चच्या उजेडात विद्यार्थ्यांचा अभ्यास; बिबट्याच्या दहशतीत शेतकरी मेटाकुटीस.
पुणे: पुणे जिल्ह्याकडील पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने थैमान घातले असून, येथील वाड्या-वस्त्यांवर अंधाराचे भयानक साम्राज्य पसरले आहे. पावसाने गेल्या काही दिवसांपासून अचानक दडी मारल्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसमोर उभी पिके डोळ्यांसमोर करपण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यातच ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखा कडक ऊन व उकाडा जाणवत असल्याने पिकांना पाण्याची तातडीची गरज भासत आहे. मात्र, अशा बिकट परिस्थितीत कृषी पंपांच्या फिडरवर सुरू असलेल्या ‘इमर्जन्सी’ लोडशेडिंगमुळे पुरंदरच्या वाड्या-वस्त्यांवरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, या वीजकोंडीचा सर्वाधिक फटका निष्पाप विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाला बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुरंदर तालुक्यातील वाल्हे, जेऊर, मांडकी, हरणी, पिंगोरी, पिसुर्टी, सुकलवाडी, वागदरवाडी आणि नीरा परिसरासह विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीतील अनेक वाड्या-वस्त्या या डोंगराळ तसेच बागायती क्षेत्रात वसलेल्या आहेत. या सर्व भागांना वीजपुरवठा करण्यासाठी कृषी पंपांच्या फिडरचा वापर केला जात असल्यामुळे, शेतीपंपांची वीज जाताच या वाड्या-वस्त्यांवरील घरगुती वीजपुरवठाही आपोआप खंडित होत आहे. रात्रीच्या वेळी अंधार पसरल्यामुळे वृद्ध, महिला आणि विशेषतः लहान मुलांना अतोनात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या परिसरात मागील काही वर्षांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, रात्रीच्या वेळी वीज गेल्यावर पसरणाऱ्या काळोखाचा फायदा घेत बिबट्याचा वावर अधिक धोकादायक बनल्याने ग्रामस्थांमध्ये सतत भीतीचे वातावरण असते. जीव मुठीत धरून जगणाऱ्या या नागरिकांना अंधारात सर्पदंशाचा धोका आणि चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे घराबाहेर पडणे अत्यंत अवघड झाले आहे, तर वाढता उकाडा व डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्नही उभे ठाकले आहेत.
या भीषण वीजसंकटाचा सर्वात मोठा आघात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. संध्याकाळी आणि रात्रीच्या शांत वेळेत वीज गायब होत असल्याने अनेक वाड्या-वस्त्यांवरील शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोबाईल टॉर्च किंवा मिणमिणत्या दिव्यांच्या उजेडात अभ्यास करण्याची वेळ आली आहे. शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या या मुलांच्या डोळ्यांवर ताण येत असून, त्यांच्या आगामी परीक्षा आणि शैक्षणिक प्रगतीवर याचा अत्यंत विपरीत परिणाम होत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे ग्रामीण भागातील एका पिढीचे भविष्य अंधारात ढकलले जात असल्याची संतप्त भावना पालकांमधून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे जमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत आणि उभी पिके वाचवण्यासाठी रात्री-बेरात्री शेतात जाऊन पाणी द्यावे लागत आहे. मात्र, कृषी पंपांसाठी वीज कधी येणार आणि कधी गायब होईल, याचा काहीही नेम नसल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे मेटाकुटीस आला आहे. बिबट्याची प्रचंड दहशत असतानाही जीव धोक्यात घालून शेतकरी अंधारातच मोटार चालू करण्यासाठी धडपडत असल्याचे विदारक चित्र येथे पाहायला मिळते. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन कृषी पंपांच्या फिडरवरील लोडशेडिंग करताना गावठाण आणि वाड्या-वस्त्यांचा घरगुती वीजपुरवठा वेगळा करावा अथवा तो सुरहित ठेवावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. जर वेळेत हा तिढा सुटला नाही, तर पुरंदरच्या मातीतील शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या रोषाचा तीव्र उद्रेक पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही.
