- Hindi News
- पुणे
- ‘विद्येच्या माहेरघरा’पासून तंत्रज्ञाननगरीपर्यंत; पुणे बनले ‘अभियंत्यांचे शहर’
‘विद्येच्या माहेरघरा’पासून तंत्रज्ञाननगरीपर्यंत; पुणे बनले ‘अभियंत्यांचे शहर’
पुणे आता 'आयटी हब'च्या पुढे जाऊन 'अभियंत्यांचे शहर' बनले आहे. ५००+ जागतिक क्षमता केंद्रे, AI, ऑटोमोबाईल व प्रगत तंत्रज्ञानाने शहराला नवी ओळख दिली.
पुणे: एकेकाळी पुणे म्हटले की डोळ्यांसमोर उभी राहायची ती संस्कृती, साहित्य, नामांकित शिक्षणसंस्था आणि विद्येचे माहेरघर असलेली ऐतिहासिक ओळख. काळ बदलला तसा माहिती-तंत्रज्ञानाच्या लाटेने या शहराला ‘आयटी हब’ म्हणून नवी जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली. आता मात्र या दोन्ही ओळखींना मागे टाकत पुणे एका नव्या आणि विस्तीर्ण टप्प्यावर येऊन ठेवले आहे. अभियांत्रिकी शिक्षणसंस्था, उच्चस्तरीय संशोधन केंद्रे, वाहन उद्योग, प्रगत तंत्रज्ञान कंपन्या, औद्योगिक पट्टे आणि त्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स व इलेक्ट्रिक वाहनांसारख्या (EV) भविष्यवेधी तंत्रज्ञानामुळे पुण्याच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिक्षणनगरीपासून ते थेट तंत्रज्ञान नगरीपर्यंतचा हा थक्क करणारा प्रवास आता पुण्याला अधिकृतपणे ‘अभियंत्यांचे शहर’ अशी नवी आणि प्रभावी ओळख मिळवून देत आहे.
महाराष्ट्राच्या २०२५-२६ च्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेवर नजर टाकल्यास राज्यातील तब्बल ३८० हून अधिक अभियांत्रिकी संस्था या प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट होते. पुण्यातील तांत्रिक शिक्षणाचा परीघ आता केवळ पारंपरिक शाखांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर संगणक, माहिती-तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिकी आणि स्थापत्य यांसारख्या विविध शाखांमध्ये विद्यार्थ्यांना अद्ययावत संधी उपलब्ध होत आहेत. परिणामी, देश-विदेशातून हुशार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुण्याकडे धाव घेत आहेत. मात्र, पुण्याची ही ‘अभियंता नगरी’ ही ओळख केवळ महाविद्यालयांच्या भरवशावर तयार झालेली नाही. पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहन निर्मिती आणि त्याच्याशी जोडलेल्या पूरक उद्योगांची अवाढव्य साखळी पुण्याच्या तांत्रिक अर्थव्यवस्थेचा कणा बनली आहे. वाहन संशोधन, चाचणी आणि प्रमाणनासाठी कार्यरत असलेल्या नामांकित संस्थांमुळे यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि ईव्ही तंत्रज्ञानातील अभियंत्यांसाठी येथे सुवर्णसंधी निर्माण झाल्या आहेत.
दुसरीकडे, हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा परिसरामध्ये विस्तारलेल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राले अभियंत्यांच्या कामाचे आणि भूमिकेचे स्वरूपच पूर्णपणे बदलून टाकले आहे. केवळ कोडिंग पुरते मर्यादित न राहता कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अनालिटिक्स, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि सायबर सुरक्षा यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये पुण्यातील तरुण तांत्रिक मनुष्यबळ धडाडीने कार्यरत आहे. जागतिक पातळीवरील बहुराष्ट्रीय कंपन्यांची अभियांत्रिकी व उत्पादन विकास केंद्रे (GCCs) पुण्यात वेगाने पाय रोवत आहेत. २०२६ मधील उद्योग अहवालानुसार पुण्यात आता ५०० हून अधिक जागतिक क्षमता केंद्रे असून, २०२४ नंतरच्या काळात तब्बल १३० हून अधिक नवीन केंद्रांनी येथे आपले बस्तान बसवले किंवा विद्यमान केंद्रांचा विस्तार केला आहे. विशेष म्हणजे, यातील सुमारे ४० टक्के केंद्रांचे कामकाज थेट कृत्रिम बुद्धिमत्तेवर केंद्रित आहे. २०२४-२५ मध्ये देशभरातील एसटीपीआय-नोंदणीकृत युनिट्सची सॉफ्टवेअर निर्यात १०.६९ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याने या तांत्रिक प्रगतीवर आणखी मजबूत शिक्कामोर्तब झाले आहे.
पुण्याची ओळख आता केवळ एक शैक्षणिक किंवा आयटी केंद्र म्हणून उरलेली नसून येथे वाहन उद्योग, संशोधन आणि नवतंत्रज्ञानाची एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. या बदलावर भाष्य करताना वरिष्ठ वास्तुविशारद संजय भुरेवाल यांच्या मते, पुणे आता केवळ तंत्रज्ञान वापरणारे शहर राहिलेले नसून ते तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या शहराकडे वाटचाल करत आहे. येथील अभियंत्यां समोर केवळ नोकरीच्या संधी शोधण्यापेक्षा शहर आणि समाजाच्या प्रत्यक्ष गरजा ओळखून त्यावर सुरक्षित व उपयुक्त तंत्रज्ञानाधारित उपाय शोधण्याचे मोठे आव्हान आहे. दुसरीकडे, सॉफ्टवेअर डेव्हलपर सीमा शिरवळ यांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्तेचा विस्तार कितीही वेगाने होत असला तरी तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी मनुष्य असणे गरजेचे आहे. पुण्यासारख्या तंत्रज्ञान केंद्रात काम करणाऱ्या अभियंत्यांनी मानवी समस्या समजून घेऊन योग्य प्रश्न विचारणे आणि निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे, ज्यामुळे तांत्रिक कौशल्या सोबतच सामाजिक जाणीवही तितकीच महत्त्वाची ठरते. ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञानाची ही अचूक सांगड आगामी काळात पुण्याला जागतिक पातळीवर एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणार यात शंका नाही.
