बाप्पांच्या जयघोषाने दुमदुमले पुणे; ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींचे आगमन

पुण्यात गणेशोत्सवाचा थाट! कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग व केसरीवाडा या मानाच्या पाचही गणपतींची दिमाखात प्राणप्रतिष्ठापना.

पुणे: पुणे शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि अथांग श्रद्धेचा सोहळा असलेल्या गणेशोत्सवाला सोमवारी पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि अभूतपूर्व उत्साहात सुरुवात झाली. ढोल-ताशांचा दणदणाट, सनई-चौघड्याचे मंगल सूर आणि अवघ्या पुण्यात दुमदुमलेला ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष अशा चैतन्यमय वातावरणात पुण्यातील मानाच्या गणपतींसह प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींच्या मूर्तींची आगमन मिरवणूक अत्यंत दिमाखात पार पडली. आगमन सोहळ्यानंतर ठरलेल्या विहित वेळेत वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात प्राणप्रतिष्ठापना सोहळे संपन्न झाल्यामुळे पुण्याचा मध्यवर्ती भाग दिवसभर भक्तीमय आणि उत्सवी वातावरणात न्हाऊन निघाला होता.

        पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपतीच्या यंदाच्या १३४व्या वर्षाच्या उत्सवाची सुरुवात सकाळी रास्ता पेठेतील पॉवर हाऊस चौकातून निघालेल्या पारंपरिक मिरवणुकीने झाली. प्रभात बँडच्या सुरावटीसह ज्ञानप्रबोधिनी, शौर्य आणि संघर्ष या पथकांनी आपल्या सादरीकरणाने मिरवणुकीत उत्साह भरला. सकाळी पौरोहित्याखाली वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे गुरुजी यांच्या हस्ते बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या पाठोपाठ मानाचा दुसरा मान असणाऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीची आगमन मिरवणूक नारायण पेठेतील मंदार लॉज येथून सकाळी १० वाजता काढण्यात आली. नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, ताल पथक आणि विष्णूनाद शंख पथकाच्या सहभागाने या मिरवणुकीची रंगत वाढवली. यंदा या मंडळातर्फे आकर्षक तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून, योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ यांच्या हस्ते दुपारी बाप्पाची प्रतिष्ठापना झाली.

       मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक सकाळी फुलांनी सजवलेल्या देखण्या रथातून आणि ढोल-ताशा पथकांच्या गजरात काढण्यात आली. दुपारी पुनितशेठ आणि जान्हवी बालन यांच्या प्रमुख उपस्थितीत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली, ज्यामध्ये यंदा पुरी येथील जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराची सुंदर प्रतिकृती भाविकांचे विशेष आकर्षण ठरली. मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक सकाळी ९ वाजता सुरू झाली आणि गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते दुपारी बाप्पाची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी साकारण्यात आलेली भव्य बृहस्पती मंदिराची सजावट आणि भाविकांसाठी श्रींच्या चरणस्पर्शाची केलेली विशेष व्यवस्था यामुळे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

       मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची पारंपरिक पालखी मिरवणूक सकाळी रमणबाग चौकातून वाजत-गाजत काढण्यात आली. बिडवे बंधूंचे सनई-चौघडा तसेच श्रीराम आणि कलावंत ढोल-ताशा पथकांच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा जोश पाहण्यासारखा होता. सकाळी रौनक रोहित टिळक यांच्या हस्ते केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना विधीवत पार पडली. या सर्व मानाच्या गणपतींच्या आगमनाने आणि प्रतिष्ठापनेने पुणे नगरीतील गणेशोत्सवाचा श्रीगणेशा अत्यंत भव्य आणि आनंददायी वातावरणात झाला असून, आगामी दहा दिवस चालणाऱ्या या महाउत्सवाचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्यांवर सातारा पोलिसांचा बडगा; दोन मंडळांवर गुन्हे

Latest News

गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्यांवर सातारा पोलिसांचा बडगा; दोन मंडळांवर गुन्हे गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्यांवर सातारा पोलिसांचा बडगा; दोन मंडळांवर गुन्हे
सातारा तालुका पोलिसांनी आगमन मिरवणुकीत लेझर बीम आणि डॉल्बी सिस्टीमचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले.
‘विद्येच्या माहेरघरा’पासून तंत्रज्ञाननगरीपर्यंत; पुणे बनले ‘अभियंत्यांचे शहर’
परंपरा जपत पर्यावरणाचेही भान ठेवा; मुख्यमंत्री फडणवीसांचे गणेशभक्तांना आवाहन
बाप्पांच्या जयघोषाने दुमदुमले पुणे; ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींचे आगमन
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात विराजमान; पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software