सणासुदीत FDAचा राज्यभर दणका; १२ लाखांचा गुटखा, २,८१३ किलो खवा-मावा जप्त, १४ परवाने निलंबित

महाराष्ट्रात FDA कडून गुटखा, अस्वच्छ खवा-मावा जप्त; मुंबईतील ऑलिंपिया कॉफी हाऊससह १४ हॉटेल्सचे परवाने निलंबित.

नागपूर: आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ सम्राटांवर आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत आक्रमक आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात राबविण्यात आलेल्या या विशेष छापासत्रात नागपूर विभागात तब्बल १२ लाख १० हजार रुपयांचा बेकायदेशीर गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वाहतुकीसाठी वापरलेली दोन वाहने ताब्यात घेण्यात आली असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्ते बाबत कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा प्रशासना कडून देण्यात आला असून नागरिकांनी कोणत्याही त्रुटी किंवा भेसळ आढळल्यास १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर अथवा एफडीएच्या अधिकृत तक्रार पोर्टलवर तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

      या व्यापक मोहिमेचा सर्वाधिक फटका मुंबईतील अनेक नामवंत हॉटेल्स आणि उपाहारगृहांना बसला आहे. अन्नसुरक्षा नियमांचे अत्यंत गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील काही प्रतिष्ठित खानावळींवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका ग्राहकाने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत कुलाब्यातील प्रसिद्ध 'ऑलिंपिया कॉफी हाऊस'चा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. प्रशासकीय तपासणी दरम्यान या हॉटेलमध्ये अन्न साठवणुकीच्या जागेजवळच मूत्रालय आढळले, तसेच किचनमध्ये झुरळे, माश्यांचा मोठा प्रादुर्भाव, मांसाचे डाग आणि अस्वच्छ पाण्याचा वापर होत असल्याचे उघडकीस आले. याशिवाय मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या कॅन्टीन मध्येही तीव्र अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन निदर्शनास आल्याने तिथेही दंडात्मक व निलंबनाची कारवाई करण्यात आली. चेंबूर येथील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, घाटकोपर मधील विश्वास स्वीट्स आणि ए-वन ड्रायफ्रूट्स, वरळीतील मिलान पंजाब तसेच मलाडमधील सद्गुरु स्वीट्स यांसारख्या प्रसिद्ध आस्थापनांवरही परवाना निलंबनाची कारवाई झाल्यामुळे अन्नधान्य व हॉटेल व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे.

      सणांच्या काळात खवा, मावा आणि मिठाईमधील वाढती भेसळ रोखण्यासाठी ठाणे, पालघर, पुणे आणि कोल्हापूर परिसरामध्ये विशेष तपासणी पथके तैनात करण्यात आली होती. या धडक कारवाईत तब्बल ७ लाख ३८ हजार रुपये किमतीचा २,८१३ किलो संशयास्पद खवा, मावा आणि मिठाईचा साठा जप्त करण्यात आला. ठाण्यातील काशिमीरा पोलीस ठाण्यासमोर दोन वाहनांमधून अत्यंत अस्वच्छ आणि धोकादायक परिस्थितीत वाहतूक केला जाणारा ५ लाख ८६ हजार रुपयांचा खवा जप्त करण्यात आला. याशिवाय पालघरमधील चारोटी टोल नाका, सातारा जिल्ह्यातील कराड आणि कोल्हापूरमधील शिरोळ येथेही दुग्धजन्य पदार्थांच्या साठ्यावर लक्ष केंद्रित करत कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

        राज्यभरात राबविण्यात आलेल्या या व्यापक मोहिमे दरम्यान एकूण २७ हॉटेल्स आणि अन्नधान्य आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ गंभीर त्रुटी आढळलेल्या आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून, उर्वरित १३ आस्थापनांना सुधारणा करण्या बाबतच्या सक्त नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथे १ लाख ९२ हजार रुपयांची संशयास्पद मिठाई, तर अहिल्यानगर आणि नाशिक रोड परिसरात भेसळयुक्त गूळ आणि तूप जप्त करण्यात आले आहे. सणासुदीच्या या काळात सर्वसामान्य नागरिकांना पूर्णपणे सुरक्षित, आरोग्यदायी आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी ही तपासणी मोहीम अशीच निरंतर सुरूच राहणार असल्याचे एफडीए प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; किकवीजवळ ट्रकला धडकून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software