पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ४४ व्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ४४ वा वर्धापन दिन १२ ऑक्टोबर रोजी साजरा होणार; विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन.

पिंपरी: औद्योगिक नगरी म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराच्या यशस्वी वाटचालीत आणि विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन यंदा अत्यंत उत्साहात आणि विविध लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या स्थापने पासून ते आज पर्यंतच्या ४४ वर्षांच्या विकास प्रवासाचा सविस्तर आढावा घेणे, शहराच्या प्रगतीत अहोरात्र योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करणे तसेच नागरिकाभिमुख व पारदर्शक प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर रवि लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य सोहळ्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे.

      दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. मात्र, यंदा ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रविवार आणि साप्ताहिक सुट्टी आल्यामुळे, मुख्य वर्धापन दिनाचा सोहळा सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्याचे अधिकृतरीत्या निश्चित करण्यात आले आहे. महानगरपालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी तसेच चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह या प्रमुख ठिकाणांवर विविध आकर्षक व संस्मरणीय कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली, ज्यामध्ये सत्ताधारी पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कला, क्रीडा, सांस्कृतिक व पर्यटन समितीचे सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, प्रभाग अध्यक्ष निखील बो-हाडे यांच्यासह विविध विभागांचे आयुक्त, उपायुक्त आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       पिंपरी-चिंचवड शहराचा आधुनिक व औद्योगिकनगरी कडून विकसित शहराच्या दिशेने झालेला थक्क करणारा प्रवास हा नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अफाट व सामूहिक सहभागातूनच साध्य झाला आहे. या गौरवशाली प्रवासाचा मागोवा घेतानाच, आगामी काळातील शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन अधिक गतिमान, तंत्रज्ञानस्नेही आणि गुणवत्तापूर्ण प्रशासन देण्याचा ठाम संकल्प या वर्धापन दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. महापौर रवि लांडगे यांनी या बैठकीत बोलताना स्पष्ट केले की, हा वर्धापन दिन म्हणजे केवळ औपचारिकता नसून, शहराच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाच्या कष्टाची दखल घेण्याचा सुवर्णयोग आहे. नागरिकांचा वाढता सहभाग आणि प्रशासनाची कर्तव्य कठोर साथ यामुळे शहराचा कायापालट सुलभ होत आहे.

       वर्धापन दिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची सुरुवात शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्याने होईल. यानंतर दिवसभरात रक्तदान शिबिर, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्पर्धा, पाककला व रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, रस्सीखेच यांसारख्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष कर्मचारी ऑर्केस्ट्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील पाहायला मिळणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या गुणवंत अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेला अधिक प्रोत्साहन मिळेल.

       कार्यक्रमांच्या यशस्वी व नियोजनबद्ध अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाला स्वतंत्र जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. माहिती व जनसंपर्क विभागा मार्फत प्रसिद्धी व सजावटीची जबाबदारी पार पाडली जाणार असून, उद्यान, स्थापत्य, विद्युत, आरोग्य, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि वैद्यकीय विभागांच्या माध्यमातून मंडप उभारणी, पुष्पसजावट, अग्निसुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचे चोख नियोजन करण्यात आले आहे. वर्षभरात महापालिकेने पूर्ण केलेल्या विविध विकास कामांची व प्रकल्पांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया आणि डिजिटल फलकांचा प्रभावी वापर केला जाणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या ४४ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा हा सोहळा शहराच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; किकवीजवळ ट्रकला धडकून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software