- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; ८ फेब्रुवारी पासून लेखी परीक्षा, १६ मार्चपर्यंत पेपर
बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; ८ फेब्रुवारी पासून लेखी परीक्षा, १६ मार्चपर्यंत पेपर
महाराष्ट्रात २०२७ मधील १२ वी बोर्डाच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर. ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ दरम्यान रंगणार परीक्षा.
मुंबई: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक करिअरच्या दृष्टीने अत्यंत टर्निंग पॉईंट मानल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून असलेल्या २०२७ मधील इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात आणि समाप्तीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंडळाच्या अधिकृत माहिती नुसार, आगामी २०२७ मध्ये बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून हे सत्र १६ मार्च २०२७ पर्यंत चालणार आहे. परीक्षेच्या या महत्त्वपूर्ण तारखा आगाऊ जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आता आपल्या अभ्यासाचे अचूक आणि दीर्घकालीन नियोजन करण्यास मोठा वाव मिळाला आहे.
बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी आणि नामांकित पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांना सर्वाधिक महत्त्व असते. त्यामुळे विद्यार्थी वर्षभर अतिशय गांभीर्याने आणि कसून या परीक्षेची तयारी करत असतात. परीक्षेचा नेमका कालावधी समोर आल्यामुळे विद्यार्थ्यांना आता उपलब्ध दिवसांचे योग्य विभाजन करता येणार आहे. मंडळा कडून सध्या केवळ परीक्षेच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, लवकरच प्रत्येक विषयानुसार सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध केले जाईल. विषयनिहाय तारखा हातात आल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, उजळणीसाठी किती दिवस राखायचे याचे परिपूर्ण नियोजन करणे शक्य होणार आहे.
बोर्डाच्या परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेच्या ताणाचा अनुभव येऊ शकतो. मात्र, या ताणाचा किंवा भीतीचा कोणताही विपरीत परिणाम अभ्यासाच्या एकाग्रतेवर होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी सुरुवाती पासूनच नियोजनबद्ध भूमिका घेणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमातील उरलेले कठीण घटक किंवा धडे वेळेत पूर्ण करून, आधी शिकवून झालेल्या भागाची नियमित उजळणी करण्यावर भर देणे आवश्यक आहे. केवळ पुस्तकी वाचन करण्यापेक्षा मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे आणि लेखी सराव वाढवणे यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. या काळात अभ्यासा सोबतच पुरेशी झोप, सकस आहार, हलका व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्यासाठी थोडा वेळ राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या भीतीखाली न वावरता उपलब्ध वेळेचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने तयारी करावी, असे आवाहन शैक्षणिक वर्तुळातून केले जात आहे.
