- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद; १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी शिकली व्य...
बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद; १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी शिकली व्यावसायिक मराठी
राज्यभरातील १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी पूर्ण केले व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण. १७ ऑगस्टला ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारोप.
मुंबई: महाराष्ट्रा मध्ये रोजगार करायचा असेल, तर येथील भाषेशी व संस्कृतीशी आपली नाळ जोडलीच पाहिजे. ही कोणतीही सक्ती नसून ती आपुलकीची आणि आदराची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक वाहनचालक हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा खराखुरा दूत ठरतो,” अशा अत्यंत भावनिक आणि प्रेरक शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला’ मिळालेल्या प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाताबद्दल आपले समाधान व्यक्त केले आहे.
राज्यात राबविण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी अभियाना अंतर्गत आतापर्यंत राज्यभरातील १ लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी अत्यंत उत्साहात व्यावहारिक मराठीचे धडे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. दरम्यान, ज्या उर्वरित चालकांनी अद्याप हे प्रशिक्षण पूर्ण केलेले नाही, त्यांनी येत्या १५ ऑगस्टपूर्वी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर व्यावहारिक मराठी आत्मसात करावी, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले आहे.
या यशस्वी अभियाना बाबत मंत्रालयात एक उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण यांच्यासह मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मराठी ही केवळ संवादाची एक साधी भाषा नसून ती महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि समृद्ध संस्कृतीचा मुख्य आत्मा आहे. या मातीतून आपली उपजीविका चालवणाऱ्या प्रत्येक नागरिकाने मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा आदर केला पाहिजे, हा आमचा अत्यंत प्रामाणिक आग्रह आहे. प्रवाशांशी संवाद साधताना जेव्हा मराठी भाषेचा वापर होतो, तेव्हा केवळ व्यावसायिक व्यवहारच सुलभ होत नाहीत, तर माणसामाणसां मधील जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे बंध अधिक घट्ट व दृढ होतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मराठी भाषेला केंद्र शासनाकडून ‘अभिजात भाषेचा दर्जा’ प्राप्त झाल्यानंतर तिच्या गौरवासाठी आणि प्रसारासाठी हाती घेण्यात आलेल्या या अभियानाला लाखो अमराठी बांधवांनी ज्या प्रकारे सकारात्मक व सन्मानपूर्वक प्रतिसाद दिला आहे, तो कौतुकास्पद आहे. मराठी भाषा शिकण्याचा त्यांचा हा पूर्णपणे स्वयंस्फूर्त सहभाग म्हणजे वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी प्रेमाला वाहिलेली खऱ्या अर्थाने सर्वात मोठी आदरांजली आहे. राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान आता खऱ्या अर्थाने एका व्यापक ‘लोकचळवळीचे’ रूप धारण करत आहे.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ भव्य व दिमाखदार समारोप आगामी १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील प्रसिद्ध राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख हस्ते या सोहळ्याचे उद्घटन व मार्गदर्शन होणार आहे.
या ऐतिहासिक समारंभ सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा विभागाचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या राज्यस्तरीय कार्यक्रमादरम्यान, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या हजारो अमराठी चालकांना गौरवान्वित करत अधिकृत प्रमाणपत्र (Certificates) वितरित केली जाणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. परिवहन विभागाने पुन्हा एकदा सर्व उर्वरित अमराठी व्यावसायिक वाहन चालकांना १५ ऑगस्टची अंतिम मुदत लक्षात घेऊन आपले प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
