- Hindi News
- पुणे
- पुणे मतदार यादीत मोठी फेर तपासणी; २४ ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध
पुणे मतदार यादीत मोठी फेर तपासणी; २४ ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध
पुणे जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम वेगात. ११ लाख अनुपस्थित मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू; २४ ऑगस्टला नवीन यादी प्रसिद्ध होणार.
पुणे: भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशा नुसार पुणे जिल्ह्यात सध्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम (SIR Drive) अत्यंत वेगाने राबवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष पडताळणी दरम्यान न आढळलेल्या सुमारे ११ लाख मतदारांची नावे आगामी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या नवीन प्रारूप मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुपस्थित मतदारांच्या अनुपस्थितीचे कायदेशीर नियम पाळत तब्बल तीन वेळा पंचनामे करून त्यांची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी यादीत एकूण मतदार संख्येत मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण ९० लाख ८० हजार १७३ इतके मतदार नोंदणीकृत आहेत. या सर्व मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची माहिती गोळा करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ८ हजार ४१७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) अहोरात्र कार्यरत आहेत. प्रशासना कडून आतापर्यंत ७५ लाख ८९ हजार ६६२ मतदारांना गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत. बीएलओंच्या माध्यमातून हे भरून घेतलेले अर्ज निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर अपलोड केले जात असून, आतापर्यंत ६२ लाख ३६ हजार ६७१ अर्जांची सखोल पडताळणी पूर्ण करून ते यशस्वीपणे अपलोड करण्यात आले आहेत.
मात्र, अद्यापही सुमारे १५ लाख गणना अर्ज बीएलओंकडे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रलंबित अर्जांमध्ये मृत, दुबार (Duplicate) आणि प्रत्यक्षात पत्त्यावर अनुपस्थित असलेल्या मतदारांची संख्या अत्यंत लक्षणीय आहे. विशेषतः, सुमारे ११ लाख अनुपस्थित मतदारांच्या बाबतीत नियमानुसार तीन वेळा पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून त्यांची नावे वगळण्याची नोंद संकेत स्थळावर करण्यात आली आहे.
या महत्त्वाच्या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेस 17 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या मतदारांचे अर्ज किंवा पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही, अशा नागरिकांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेत स्थळावरून आपल्या संबंधित बीएलओची (BLO) माहिती मिळवावी आणि त्यांच्याशी संपर्क साधून आपले कागदपत्रे वा अर्ज लवकरात लवकर पूर्ण करून द्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या प्राथमिक आकडे वारीनुसार, संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल दोन लाख मतदार मृत असल्याचे निदर्शनास आले आहेत. याशिवाय दुबार नावे, स्थलांतरित आणि अपूर्ण अर्ज यांमुळे आगामी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतील एकूण मतदारसंख्या किमान १२ ते १३ लाखांनी घटण्याची शक्यता आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी स्पष्ट केले आहे की, २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही नियमा नुसार आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची किंवा दुरुस्त करून घेण्याची संधी नागरिकांना उपलब्ध राहणार आहे. परंतु, यासाठी सर्व संबंधित मतदारांनी आपले गणना अर्ज वेळेत व अचूकपणे भरून देणे अत्यंत आवश्यक आहे. या मोठ्या प्रशासनिक कारवाईमुळे पुणे जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मोठी मदत होणार आहे.
