- Hindi News
- सातारा
- सातारा जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी; १८९४ ठराव दाखल
सातारा जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी; १८९४ ठराव दाखल
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी १८९४ ठराव प्राप्त. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; लवकरच प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्ध.
सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. बँकेच्या निवडणुकी साठी मतदार निश्चित करण्याच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला असून, जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांकडून प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी ठराव दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे एकूण १८९४ ठराव प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घडामोडी मुळे सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
यंदाच्या निवडणुकीत एकूण २१ संचालक पदांसाठी मतदान होणार असून, त्यापैकी ५ जागा राखीव असणार आहेत. उर्वरित जागांसाठी विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आपले मतदान करून संचालक निवडणार आहेत. विशेषतः 'विकास सेवा सोसायट्यांच्या' मतदार संघात सर्वाधिक मतदार संख्या असल्याने, या गटात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि ठराव मिळवण्यासाठी जिल्ह्यातील विविध राजकीय गटांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती.
४ ऑगस्ट अखेर प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, केवळ विकास सेवा सोसायट्यांकडून एकूण ९५५ ठराव दाखल झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील तालुक्यांचा समावेश आहे:
सातारा – १४६
कराड – १४५
फलटण – १३९
पाटण – १०४
खटाव – १०१
कोरेगाव – ८७
माण – ७५
वाई – ५९
खंडाळा – ४९
जावळी – ४८
महाबळेश्वर – ११
याशिवाय, कृषी उत्पादन प्रक्रिया व सहकारी साखर कारखाने, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका व पतसंस्था, गृहनिर्माण व दूध संस्था तसेच इतर सहकारी संस्थांचे मिळून एकूण ९३९ ठराव दाखल झाले आहेत. त्यामुळे विकास सोसायट्या आणि इतर संस्थांचे मिळून एकूण ठरावांची संख्या १८९४ वर पोहोचली आहे.
ठराव दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला होता. काही ठिकाणी निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्त ठेवावा लागला. विशेषतः जावळी तालुक्यातील एका भागात जमावबंदीचे आदेश लागू करावे लागले होते, तर कराड आणि माण तालुक्यातही ठराव प्रक्रियेदरम्यान काही वादग्रस्त घडामोडी घडल्याची चर्चा रंगली असून काही लहान-मोठ्या घटनांची पोलिसांकडे नोंदही करण्यात आली आहे.
या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार उदयनराजे भोसले, बँकेचे अध्यक्ष तथा खासदार नितीन पाटील, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, मनोज घोरपडे, डॉ. अतुल भोसले आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा थेट पणाला लागली आहे. त्यामुळे आगामी काळात उमेदवारी, तगडी गटबांधणी आणि मतदारांवर आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी राजकीय डावपेच आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
प्रशासकीय स्तरावर ठराव स्वीकारण्याची प्रक्रिया यशस्वी रीत्या पूर्ण झाल्यानंतर, आता विभागीय सहनिबंधक कार्यालया कडून ‘प्रारूप मतदार यादी’ प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागवून त्यावर सुनावणी घेतली जाईल आणि त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. या संपूर्ण प्रक्रिये नंतरच निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम घोषित होणार असल्याने, सहकार क्षेत्रासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष आता या पुढील प्रशासकीय घडामोडींकडे लागले आहे.
