- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- सुनेत्रा पवारांवरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाईची मागणी
सुनेत्रा पवारांवरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाईची मागणी
सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यावरून राष्ट्रवादी नेते संजय काकडे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधींकडे राजीनाम्याची मागणी.
मुंबई: काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात करण्यात आलेल्या अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या वादावादी नंतरही पक्षाच्या भूमिकेचे समर्थन केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय काकडे यांनी थेट काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेसने आपली घाण मानसिकता दाखवली – संजय काकडे:
या प्रकरणावर तीव्र निषेध नोंदवताना राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे म्हणाले की, "काँग्रेस पक्षाने या प्रकारच्या टीकेतून आपली अत्यंत घाण प्रवृत्ती आणि मानसिकता पुन्हा एकदा जगासमोर आणली आहे. महाराष्ट्राची जनता त्यांच्या या कृत्याला निवडणुकीच्या माध्यमातून योग्य तो धडा शिकवेल. जर काँग्रेसने या प्रकरणी जाहीर माफी मागितली नाही, तर आम्ही त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. त्यांच्या या नेत्यांना आया-बहिणींचा सन्मान राखावा हे माहीत नाही का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढत काकडे पुढे म्हणाले की, अशा खालच्या पातळीची विधाने करणाऱ्या आणि त्याचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. राहुल गांधींनी अशा अध्यक्षांना तातडीने बडतर्फ करून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जर त्यांनी आपल्या या विधानाची अद्याप माफी मागितली नाही, तर काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि त्यांना काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. केवळ मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी किंवा कोणाच्यातरी सुपारीवरून असे जाणीवपूर्वक बोलले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. या राजकीय वादामुळे आगामी काळात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
