- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- बांकीपूर पराभवाने विरोधकांना बळ; राऊतांचे स्पष्टीकरण
बांकीपूर पराभवाने विरोधकांना बळ; राऊतांचे स्पष्टीकरण
बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. राम मंदिर, सिद्धिविनायक मंदिर व मोहन भागवत यांच्यावर भाष्य.
मुंबई: देशातील तीन राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विशेषतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या रिक्त झालेल्या आणि सलग ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या बिहारमधील बांकीपूर मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, हा निकाल म्हणजे मोदी सरकार आणि भाजपच्या घसरत चाललेल्या लोक प्रियतेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. तसेच, यावेळी पत्रकार परिषदेत राम मंदिरातील कथित दान चोरीवरून सत्ताधाऱ्यांना घेरणाऱ्या संजय राऊतांना जेव्हा सिद्धिविनायक मंदिरातील चोरीच्या प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी यावर सावध पवित्रा घेतला.
बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील निकालांवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, ही जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी यापूर्वी मोठ्या मताधिक्याने जिंकली होती. मात्र, आता ती राखण्यात भाजपला अपयश आले आहे. पोटनिवडणुकीच्या या निकालांमुळे देशभरातील विरोधी पक्षांचा आत्मविश्वास दुप्पट वाढला आहे. इतिहासाचा दाखला देत ते म्हणाले की, अलाहाबाद पोटनिवडणुकीत व्ही.पी. सिंग यांच्या विजयानंतर ज्याप्रमाणे काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली होती, तसेच काहीसे चित्र आता पाहायला मिळत आहे. जनतेचा विरोधक आणि महाविकास आघाडीच्या भूमिकेला आता भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
पत्रकार परिषदेत राम मंदिरातील दानाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करणाऱ्या संजय राऊतांना, मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणाबाबत आणि शिवसेना नेत्या विशाखा राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत उत्तर देत म्हटले की, “ज्या गोष्टीबद्दल मला सविस्तर माहिती नाही, त्या विषयावर मी बोलणार नाही. हा एक तांत्रिक मुद्दा असून मी या प्रकरणाच्या खोलात गेलेलो नाही, त्यामुळे यावर माझे भाष्य करणे योग्य ठरणार नाही.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या 'जेन झी' (Gen-Z) तरुणांसोबतच्या संवादाच्या शक्यतेवर बोलताना संजय राऊतांनी जोरदार टोला लगावला. ते म्हणाले की, संघाच्या किंवा भाजपच्या नेत्यांची मुले आणि नातवंडं म्हणजे 'जेन झी' नव्हेत. 'जेन झी' म्हणजे ती तरुण मुलं आहेत, ज्यांनी जंतर-मंतरवर येऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन केले, घोषणा दिल्या आणि ज्यांच्यावर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. संघाच्या प्रमुखांमध्ये खरोखरच संवाद साधण्याची इच्छा असेल, तर त्या आंदोलक मुलांपैकी दोन हजार मुलांना चर्चेसाठी बोलवावे आणि त्यांच्याशी संवाद साधावा, असे आव्हानही राऊतांनी यावेळी दिले.
