- Hindi News
- देश
- एअर इंडियाच्या विमानाला हवेत धक्का; ३०० फूट घसरल्याने १४ जखमी
एअर इंडियाच्या विमानाला हवेत धक्का; ३०० फूट घसरल्याने १४ जखमी
एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानाला हवेत तीव्र टर्ब्युलन्सचा धक्का. विमान ३०० फूट घसरून १० प्रवासी व ४ केबिन क्रू जखमी; दिल्लीत सुरक्षित लँडिंग.
नवी दिल्ली: थायलंडमधील फुकेत येथून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) फ्लाइट AI2379 ला उड्डाणा दरम्यान अत्यंत तीव्र टर्ब्युलन्सचा (हवेतील जोरदार धक्के) सामना करावा लागला. या अपघाती परिस्थितीमुळे विमानाची उंची काही क्षणांतच सुमारे ३०० फुटांनी खाली घसरली, ज्यामुळे विमानात मोठी खळबळ उडाली. या अचानक बसलेल्या धक्क्यांमुळे १० प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्य असे एकूण १४ जण जखमी झाल्याची माहिती एअर इंडियाने अधिकृत निवेदनात दिली आहे. सुदैवाने, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले असून एक मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे VT-EXO नोंदणी असलेले विमान फुकेतहून दिल्लीच्या दिशेने प्रवास करत असताना अचानक तीव्र टर्ब्युलन्स किंवा अपड्राफ्ट-डाउनड्राफ्टच्या प्रभावा खाली आले. वातावरणातील दाब आणि वाऱ्याच्या वेगात अचानक झालेल्या बदलामुळे विमानाच्या उंचीत मोठी तफावत निर्माण झाली आणि विमान ३०० फूट खाली फेकल्यासारखे झाले. या जोरदार धक्क्यांमुळे अनेक प्रवाशांचा तोल गेला आणि काही प्रवासी व केबिन क्रू यांना दुखापती झाल्या.
मात्र, अत्यंत कठीण परिस्थितीतही वैमानिकाने कमालीचे प्रसंगावधान राखत विमानावर त्वरित नियंत्रण मिळवले आणि उड्डाण सुरक्षितपणे पुढे चालू ठेवले. विमान दिल्ली विमानतळावर उतरण्यापूर्वीच विमानतळ प्रशासनाला आणि वैद्यकीय पथकाला याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. त्यामुळे विमान सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर सर्व जखमींना तातडीने वैद्यकीय मदत आणि उपचार पुरवण्यात आले.
या दुर्घटनेनंतर एअर इंडियाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असून बाधित झालेल्या सर्व प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. तसेच या घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येणार असून संबंधित विमान वाहतूक प्राधिकरणाला पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
टर्ब्युलन्स म्हणजे काय आणि काळजी का आवश्यक आहे?
हवेमध्ये उड्डाण करताना वातावरणातील दाब, वेग किंवा हवेच्या प्रवाहात अचानक होणाऱ्या बदलांमुळे विमानाला जे जोरदार धक्के बसतात, त्याला टर्ब्युलन्स म्हटले जाते. अशा वेळी विमानाच्या उंचीमध्ये अचानक बदल होऊ शकतो. या घटनेवरून पुन्हा एकदा विमान प्रवासा दरम्यान 'सीट बेल्ट' सतत बांधून ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. अनेकदा विमान कंपन्या सीट बेल्टचा सिंग्नल बंद झाल्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने बेल्ट बांधून ठेवण्याचा सल्ला देतात. वैमानिकाच्या तत्परतेमुळे आणि योग्य निर्णयामुळे विमान सुखरूप खाली उतरले असले, तरी या घटनेने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण केले होते.
