- Hindi News
- पुणे
- २ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवाला...
२ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल
विशेष वृत्त/पुणे:
इमारतीच्या पाया खोदकामात नियमबाह्य काम झाल्याचे सांगून दोन कोटी रुपयांचा दंड ठोकण्याची भीती दाखवत तब्बल १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या शिवाजीनगर येथील महिला तलाठी आणि कोतवालावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आश्विनी दत्तात्रय कोकाटे (वय ३७, पद- तलाठी, शिवाजीनगर तलाठी कार्यालय) आणि महेश मधुकर मुंढे (वय ३०, पद- कोतवाल) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी ३७ वर्षीय खोदकाम कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार नोंदवली होती.
काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार कंत्राटदाराच्या फर्ममार्फत सेनापती बापट रोडवरील सर्व्हे नं. ९६७ येथील एका कमर्शियल प्रोजेक्टच्या इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरू होते. या खोदकामाचा पंचनामा तलाठी आश्विनी कोकाटे यांनी केला होता. पंचनाम्यात ३२०० ब्रास जास्त खोदकाम दाखवून, 'तुम्हाला २ कोटींचा दंड बसेल' अशी भीती कोकाटे यांनी कंत्राटदाराला दाखवली. हा दंड टाळण्यासाठी आणि तहसिलदारांकडे 'निल' (शून्य) पंचनाम्याचा अहवाल सादर करण्यासाठी त्यांनी कंत्राटदाराकडे १० लाख रुपयांच्या लाचेची थेट मागणी केली.
पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध
कंत्राटदाराने याबाबत १५ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. तक्रारीच्या अनुषंगाने १६ जून २०२६ रोजी पथकाने केलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान, तलाठी कोकाटे यांनी १० लाखांची लाच मागितल्याचे आणि ही रक्कम कोतवाल महेश मुंढे याच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. तसेच कोतवाल मुंढे यानेही लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून या गुन्ह्यास प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.jpeg)
या प्रकरणी ४ ऑगस्ट २०२६ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा (गु. रजि. नं. २०५/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे, पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके व त्यांच्या पथकातील विकास आडके, वैशाली माकर आणि दीपक काकडे यांनी केली.
