- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- शिंदेंच्या लंडन दौऱ्याआधी विमान प्रवासात मोठा बदल; तांत्रिक बिघाडामुळे झ्युरीकला वळवले
शिंदेंच्या लंडन दौऱ्याआधी विमान प्रवासात मोठा बदल; तांत्रिक बिघाडामुळे झ्युरीकला वळवले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्या दरम्यान अधिकाऱ्यांच्या विमानाचे झ्युरीकला इमर्जन्सी लँडिंग. शिंदे वेळेत लंडनमध्ये दाखल.
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन दिवसीय अत्यंत महत्त्वाच्या लंडन दौऱ्याची सुरुवात झाली असून, ब्रिटीश संसदेत ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष कार्यक्रमां मध्ये त्यांना तीन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. या दौऱ्या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली असून, उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांचे विमान तांत्रिक बिघाडामुळे लंडनऐवजी थेट स्वित्झर्लंड मधील झ्युरीकला वळवावे लागल्याची माहिती पुढे आली आहे. असे असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वतःचे विमान वेळेत लंडनमध्ये पोहोचले असून त्यांचे नियोजित कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत मुंबईहून लंडनकडे निघालेल्या त्यांच्या ओएसडी (विशेष कार्य अधिकारी) आणि अधिकृत फोटोग्राफर यांच्या विमाना मध्ये प्रवासा दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान नियोजित लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरण्याऐवजी स्वित्झर्लंड मधील झ्युरीकला डायव्हर्ट करण्यात आले. या अचानक झालेल्या तांत्रिक बदलामुळे मुंबईतून पुरस्कार सोहळ्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना काही काळ अडचणीचा सामना करावा लागला. झ्युरीकमध्ये अडकलेल्या या अधिकाऱ्यांना सुरक्षितपणे लंडनला नेण्याची तातडीची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून वेळेत लंडन मध्ये दाखल झाले आहेत.
ब्रिटीश संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये मंगळवारी ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष सोहळ्यात यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि कॅनव्हास फॉर केअर तर्फे उपमुख्यमंत्र्यांना प्रतिष्ठित ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक यांच्या वतीने उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांनी उपमुख्यमंत्र्यांना या सोहळ्याचे विशेष निमंत्रण दिले होते.
शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांसारख्या अत्यंत लोकप्रिय, लोक कल्याणकारी व पारदर्शक उपक्रमांची जागतिक स्तरावर दखल घेऊन हा बहुमान दिला जात आहे. विशेष म्हणजे, हाऊस ऑफ लॉर्ड्स मधील या सोहळ्यात संसदीय कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, यात ब्रिटनमधील शाळकरी मुलांनी महाराष्ट्राच्या लाडकी बहीण आणि शासन आपल्या दारी योजनांच्या संकल्पनेवर आधारित काढलेली आकर्षक चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.
या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० सप्टेंबर रोजी इंडो-युरोपियन बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरमच्या वतीने हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६: ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉग’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या उच्चस्तरीय परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार असून, त्यांना ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय मंचावरून ते महाराष्ट्राच्या विकासाचे दूरदर्शी व्हिजन मांडण्या सोबतच भारत आणि युके यांच्यातील द्विपक्षीय आर्थिक संबंधांवर मार्गदर्शन करणार आहेत. तांत्रिक बिघाडाच्या लहानशा अडथळ्या नंतरही हा दौरा महाराष्ट्राची जागतिक पातळीवर प्रतिमा उंचावण्यासाठी आणि राज्यासाठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
