- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; दिवसा मोफत वीज, थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्रही मिळणार
शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; दिवसा मोफत वीज, थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्रही मिळणार
कागलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. सौर कृषी वाहिनी योजनेतून १००% शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज आणि कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देणार.
कागल: राज्यातील शेतकरी बांधवांना दिलेले प्रत्येक शब्द आणि वचन पूर्ण करत राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी दिली असून, यापुढे राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र अधिकृतरीत्या देण्यात येणार आहे, अशी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा दायक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कागल नगरीत विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या ऐतिहासिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या प्रमुख उपस्थित होत्या.
शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत आणि दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी ‘सौर कृषी वाहिनी योजनेला’ सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या योजने अंतर्गत सध्या राज्यातील ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत हे प्रमाण वाढवून ९० टक्के आणि आगामी वर्षात राज्यातील शंभर टक्के (१०० टक्के) शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे.
या कागल दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांचा शुभारंभ पार पडला. कागल नगरपरिषदेच्या वतीने ऐतिहासिक हिंदूराव घाटगे विद्यालयाच्या नूतनीकरण व जीर्णोद्धार कामाचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न झाला. तसेच बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातील क्रांतिकारी कार्याचे सविस्तर स्मरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी वारसा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि राजर्षी शाहू महाराजांचे समतेचे विचार या त्रिसूत्रीच्या बळावरच राज्य सरकार सर्व सामान्यांच्या हितासाठी काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राधानगरी धरण हा राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्याचा अप्रतिम नमुना असल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले.
शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्ष अमलात आणत आता पर्यंतची विक्रमी कर्जमाफी देण्यात आली असून, ५६ हजार शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांना वीज विनामूल्य देण्यासाठी शासन दरवर्षी तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा खर्च करत असून, ५८ हजार कोटी रुपयांची मोठी थकबाकी देखील शासनानेच भरली आहे. साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी इथेनॉल धोरण अत्यंत महत्वाचे ठरत असल्याचे सांगत, इथेनॉलमुळेच आज साखर कारखानदारी अडचणीच्या काळातही टिकून राहिली आहे, असे त्यांनी नमूद केले. कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीचे नवे उच्चांक गाठले गेल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली आहे. साखर कारखानदारी अधिक सक्षम करण्यासाठी ‘झिरो वेस्ट’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून स्पेंट वॉश आणि प्रेस मडपासून सीबीजी व सीएनजीची निर्मिती केली जाणार असून, या उपउत्पादनातून मिळणारा अतिरिक्त निधी कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासह शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी वापरला जाईल. विशेष म्हणजे, देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी आणि वंचितांच्या हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही तितकेच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीनंतर आता पुढील टप्प्यातील विविध कल्याणकारी कामांना सुरुवात झाली असून, महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर अधिक वेगाने पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि कागल तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. तर माजी आमदार समरजितसिंह घाटगे यांनी शेतकरी कर्जमुक्तीच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या दिमाखदार सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, आमदार डॉ. विनय कोरे-सावकर, राहुल आवाडे, शिवाजीराव पाटील, अशोकराव माने, महापौर रूपराणी निकम, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते आणि मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक नगराध्यक्षा सविता माने यांनी केले तर आभार उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी मानले.
