- Hindi News
- देश
- संसदेचे पावसाळी अधिवेशन अखेरच्या टप्प्यात; केरळच्या नामांतरासह महत्त्वाच्या विधेयकांवरून गदारोळाची श...
संसदेचे पावसाळी अधिवेशन अखेरच्या टप्प्यात; केरळच्या नामांतरासह महत्त्वाच्या विधेयकांवरून गदारोळाची शक्यता, विरोधक आक्रमक
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा वादळी ठरण्याची शक्यता. केरळचे नामांतर आणि FCRA विधेयकावरून विरोधक आक्रमक; राहुल गांधींचा थेट इशारा.
नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा अत्यंत वादळी आणि संघर्षमय ठरण्याची चिन्हे आहेत. मागील पंधरा दिवसांपासून संसदेत सुरू असलेला सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणाव आता शेवटच्या आठवड्यात आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. विदेशातून निधी प्राप्त करण्याबाबतचे ‘एफसीआरए’ (FCRA) नियमन विधेयक, केरळ राज्याचे नामांतर आणि इतर महत्त्वपूर्ण कायदेशीर प्रस्तावांमुळे चालू आठवड्यात दोन्ही सभागृहांमध्ये मोठी खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिवेशनाच्या या अखेरच्या टप्प्यात केंद्र सरकार संसदेत काही अत्यंत महत्त्वाची विधेयके सादर करण्याच्या तयारीत आहे. लोकसभा कामकाजात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामार्फत केरळ राज्याच्या नामांतरा बाबतचे विधेयक तसेच राष्ट्रीय सहकारी विकास निगम सुधारणा विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, विदेशातून निधी प्राप्त करण्या बाबतचे ‘एफसीआरए’ नियमन विधेयक देखील येत्या बुधवारी चर्चा आणि मंजुरीसाठी आणले जाऊ शकते. या विधेयकाला काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. दुसरीकडे, राज्यसभेतही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यातर्फे महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी-शहा यांनी विविध पक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढवल्याने संख्याबळाच्या राजकारणातही वेग आला आहे.
मागील पंधरा दिवसांच्या कामकाजावर नजर टाकल्यास, संसदेत फारसे सकारात्मक काम होऊ शकले नसल्याचे स्पष्ट होते. लोकसभेत कामकाजासाठी निश्चित केलेल्या ९० तासांपैकी केवळ १५.३६ तास आणि राज्यसभेत २४.२१ तास कामकाज झाले. प्रचंड घोषणाबाजी आणि गदारोळातच लोकसभेत आठ आणि राज्यसभेत सहा विधेयके मंजूर करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील सुधारणांच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारा प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन द्यावे आणि राम मंदिरातील कथित दानचोरीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा व्हावी, या मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, सभागृहात कोणता मंत्री उपस्थित राहावा, हे विरोधक ठरवू शकत नाहीत, असे प्रत्युत्तर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिले होते. तरीही, ‘केलेल्या कृत्याबद्दल आज ना उद्या सरकारला उत्तरे द्यावीच लागतील,’ असा आक्रमक पवित्रा राहुल गांधी यांनी कायम ठेवला आहे.
या संपूर्ण अधिवेशनात विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाच विशेष लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे. खासदारांच्या कठीण प्रश्नांना उत्तरे देण्याचे धाडस नसल्यामुळे हे दोन्ही वरिष्ठ नेते सभागृहाकडे पाठ करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे संसदेच्या या शेवटच्या आणि निर्णायक आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सभागृहात प्रत्यक्ष उपस्थित राहून विरोधकांच्या सर्व आक्षेपांना उत्तरे देणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. विरोधकांच्या तीव्र भूमिकेमुळे शेवटच्या आठवड्यातही कामकाज सुरळीत चालण्याची शक्यता अत्यंत कमी असून गदारोळातच अधिवेशन संपण्याची दाट शक्यता आहे.
