- Hindi News
- देश
- इथेनॉल मिश्रणावरून वाद पेटला; भाजप खासदार जनार्दन मिश्रांची संतापजनक टिप्पणी
इथेनॉल मिश्रणावरून वाद पेटला; भाजप खासदार जनार्दन मिश्रांची संतापजनक टिप्पणी
पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणा विरोधातील आंदोलकांवर भाजप खासदार जनार्दन मिश्रांची जीभ घसरली. रीवा विमानतळावरील कार्यक्रमात थेट बापावरून वादग्रस्त विधान.
मध्य प्रदेश: पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणावरून सध्या देशभरात विविध चर्चा आणि विरोध दर्शवला जात असतानाच, भारतीय जनता पक्षाचे वादग्रस्त खासदार जनार्दन मिश्रा यांनी यावर अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त विधान केले आहे. "शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येईल का?" असा संतप्त सवाल करत त्यांनी इथेनॉल मिश्रणाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मध्य प्रदेशातील रीवा विमानतळावर एका कार्यक्रमा दरम्यान केलेल्या या विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
रीवा विमानतळावर कोलकाता-रीवा-भोपाळ विमान सेवा सुरू करण्याच्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात खासदार जनार्दन मिश्रा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला, राज्यमंत्री प्रतिभा बागडी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, खासदार व आमदार उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना खासदार मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे आणि देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाचे भरभरून कौतुक केले. तसेच, सरकारने घेतलेल्या पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाचे समर्थन करताना ब्राझीलसारख्या देशांचे उदाहरण दिले आणि भारतीय वाहने इथेनॉलवर चालण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, इथेनॉल मिश्रणाला होत असलेल्या विरोधावर बोलताना त्यांची जीभ घसरली. सध्या देशभरात इथेनॉल मिश्रणाविरोधात तीव्र आंदोलन होत असून अनेकांकडून 'शुद्ध पेट्रोल'ची मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावर संताप व्यक्त करत खासदार मिश्रा म्हणाले की, "इथेनॉल मिश्रणाविरोधात आंदोलन होतंय, शुद्ध पेट्रोल पाहिजे म्हणून मागणी केली जाते. पण शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येईल का? देशात शुद्ध पेट्रोल आहेच कुठून, मग ते आणणार कुठून?" त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याशिवाय, इतर देशांच्या तुलनेत भारतात महागाईचे प्रमाण खूप कमी असल्याचा दावाही त्यांनी याप्रसंगी केला.
जनार्दन मिश्रा हे आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांसाठी यापूर्वीही अनेकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या या ताज्या वक्तव्यामुळे इथेनॉल विरोधाचा वाद आणखी पेटण्याची शक्यता असून सोशल मीडियावर त्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
