पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी एल्गार; क्रांतीदिनी महामार्गावर चक्का जाम आंदोलन

पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलल्याने उत्तर महाराष्ट्र व पुणे पट्ट्यात संताप. क्रांतीदिनी महामार्गावर चक्का जाम आंदोलन, बाळासाहेब थोरातांचा इशारा.

पुणे: नाशिक-पुणे सेमी-हायस्पीड सरळ रेल्वेमार्गाचा मूळ मार्ग बदलण्याच्या निर्णया विरुद्ध उत्तर महाराष्ट्र आणि पुणे पट्ट्यात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. क्रांतीदिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. ९) नाशिक, सिन्नर, संगमनेर, जुन्नर, मंचर, चाकण आणि आळेफाटा परिसरात हजारो ग्रामस्थ, शेतकरी व विविध पक्षांचे नेते रस्त्यावर उतरले. पुणे-नाशिक महामार्गावर एकाच वेळी जोरदार ‘चक्का जाम’ आंदोलन करत शासनाच्या नवीन मार्ग बदलाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” आणि “नाशिक-पुणे सरळ रेल्वे हीच एकच मागणी” अशा नारांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

       सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग खेड, आंबेगाव आणि जुन्नर यांसारख्या कृषीप्रधान तालुक्यांमधून आखण्यात आला होता. यामुळे या भागातील शेतमाल वाहतुकीला आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील जागतिक दर्जाच्या ‘जीएमआरटी’ (GMRT) दुर्बिणीला धोका निर्माण होत असल्याचे कारण पुढे करत रेल्वे मंत्रालयाने अचानक या मार्गात बदल करण्याचा घाट घातला. स्थानिक जनतेला विश्वासात न घेता घेतलेला हा निर्णय या भागातील विकासाला बाधा पोहोचवणारा आणि अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

      या आंदोलना दरम्यान विविध भागांत अभूतपूर्व जनसमुदाय दिसून आला. संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरगाव पावसा टोलनाक्यावर प्रचंड चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, केंद्र व राज्य सरकारसह संबंधित सर्व विभागांची मंजुरी असताना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अचानक थांबला कसा आणि या चांगल्या कामात कोणी खोडा घातला, हे जनतेला समजले पाहिजे. जेथे रेल्वेचे काम थांबले आहे, तेथूनच पुन्हा सरळ मार्गाने काम सुरू करावे, आम्ही अटकेला किंवा दडपशाहीला घाबरणारे नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

       दुसरीकडे, सिन्नर आणि संगमनेर तालुक्यातील तब्बल चार हजारांहून अधिक नागरिकांनी महामार्गावरील गोंदे येथे नाशिक-पुणे महामार्ग व समृद्धी महामार्गावर एकत्र येत रास्ता रोको केला. चाकण, मंचर, नारायणगाव आणि आळे फाटा परिसरातही नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आंदोलकांनी प्रवाशांची कोणतीही मोठी गैरसोय होऊ नये म्हणून संयम पाळत पोलिसांना सहकार्य केले आणि महामार्गावर वाहतूक संथगतीने सुरू ठेवली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. जर शासनाने या जनभावनांचा व मागण्यांचा तातडीने फेरविचार केला नाही, तर यापेक्षाही अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी आणि रेल्वे कृती समितीने दिला आहे. राजकारण बाजूला सारून या प्रकल्पासाठी सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ एकत्र लढा देत असल्याने शासनाला यावर काय निर्णय घ्यावा लागतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

इथेनॉल मिश्रणावरून वाद पेटला; भाजप खासदार जनार्दन मिश्रांची संतापजनक टिप्पणी

Latest News

इथेनॉल मिश्रणावरून वाद पेटला; भाजप खासदार जनार्दन मिश्रांची संतापजनक टिप्पणी इथेनॉल मिश्रणावरून वाद पेटला; भाजप खासदार जनार्दन मिश्रांची संतापजनक टिप्पणी
पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणा विरोधातील आंदोलकांवर भाजप खासदार जनार्दन मिश्रांची जीभ घसरली. रीवा विमानतळावरील कार्यक्रमात थेट बापावरून वादग्रस्त विधान.
औंध रुग्णालयातील ५० खाटांच्या आयसीयूवर गंभीर प्रश्न; कोट्यवधींच्या साहित्याची उच्चस्तरीय चौकशी
कुणबी प्रमाणपत्र रद्दीकरणावरून जरांगे आक्रमक; सरकारला आंदोलनाचा इशारा
पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी एल्गार; क्रांतीदिनी महामार्गावर चक्का जाम आंदोलन
कामशेतमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर; ५ लाख खर्चूनही स्वच्छता कोलमडली

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software