- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- पंढरपूर मंदिर व घाट परिसराचा होणार कायापालट; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली पाहणी; विकास कामांन...
पंढरपूर मंदिर व घाट परिसराचा होणार कायापालट; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली पाहणी; विकास कामांना गती देण्याचे प्रशासनाला निर्देश
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली पंढरपूर येथील विकास कामांची पाहणी. ७३ कोटींच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आणि कॉरिडॉर प्रकल्पाला गती देण्याचे आदेश.
पंढरपूर: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पंढरपूरचा विशेष दौरा केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी चंद्रभागा नदीचा घाट आणि ऐतिहासिक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत तेथील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची होणारी गर्दी आणि भाविकांच्या सोयी सुविधांचा विचार करता हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिवांनी सर्वप्रथम चंद्रभागा घाट परिसराची पाहणी केली. नदीपात्रातील स्वच्छता, भाविकांसाठी स्नानाची सुसज्ज व्यवस्था आणि घाटावरील प्रकाश व्यवस्थेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात, त्यामुळे भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये. स्वच्छतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च प्राधान्य देऊन भाविक व वारकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सक्त सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी यावेळी घाटावर सुरू असलेल्या विविध विकासकामांची आणि नियोजनाची माहिती दिली.
यानंतर श्री अग्रवाल यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ७३ कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या सुशोभिकरणाचे काम त्यांनी पाहिले. यावेळी त्यांनी प्रस्तावित श्री क्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाचा आराखडाही अभ्यासला. यामध्ये मंदिर परिसरातील भाविकांसाठी सुलभ दर्शन मार्ग, प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग, भक्त निवास, बहुमजली पार्किंग, प्रसादालय, माहिती केंद्र, वैद्यकीय मदत कक्ष तसेच वृद्ध व दिव्यांगांसाठी विशेष मार्ग या सुविधांचा समावेश आहे. गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रवेश-निर्गम मार्ग, सीसीटीव्ही व अग्निशमन यंत्रणेसह पोलीस प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या ए.आय. (AI) तंत्रज्ञानाबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत व सर्व विभागांमध्ये समन्वय राखण्याबाबत मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
दौऱ्यादरम्यान मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले आणि राज्यातील शेतकरी व भाविकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांचा सत्कार केला. या पाहणी दौऱ्यात नगराध्यक्षा प्रणिता भालके, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांत अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुंटे, मुख्याधिकारी महेश रोकडे आणि मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण घम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
