- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; राज्यातील ३३ हजारांहून...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; राज्यातील ३३ हजारांहून अधिक विद्यार्थी ठरले शिष्यवृत्ती धारक
MSCE प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर! ३३,२८१ विद्यार्थी पात्र ठरले. mscepune.in वर निकाल आणि प्रमाणपत्रे उपलब्ध.
मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE) घेण्यात आलेल्या प्राथमिक (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक (इयत्ता सातवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धात्मक परीक्षेतून राज्यातील तब्बल ३३ हजार २८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. राज्यभरातील या यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या गुणांच्या आधारे विविध संवर्गनिहाय मंजूर संच निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, इयत्ता चौथीसाठी एकूण १६ हजार ६९३, तर इयत्ता सातवीसाठी विविध संवर्गांतील १६ हजार ५८८ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी आणि डिजिटल प्रमाणपत्रे आता संबंधित शाळांच्या अधिकृत लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
विद्यार्थी, पालक, शाळा आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अंतिम निकाल, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय गुणवत्ता याद्या, जिल्हानिहाय शाळांची सांख्यिकी माहिती आणि संवर्गनिहाय कटऑफ गुणांची सविस्तर माहिती https://mscepune.in आणि https://२०२६-२.puppssmsce.in या अधिकृत संकेत स्थळांवरून डाऊनलोड करता येणार आहे. दरम्यान, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे मूळ प्रमाणपत्र त्यांचे बँक खाते आणि आवश्यक ओळख क्रमांकाची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरल्यानंतरच प्राप्त होणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की, मान्यता प्राप्त नसलेल्या शाळांमधून परीक्षेस बसलेले विद्यार्थी, ठरवून दिलेल्या वयोमर्यादे पेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी, परीक्षेचे शुल्क न भरलेले विद्यार्थी तसेच नियमानुसार आवश्यक पात्रता पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश अंतिम गुणवत्ता यादीत करण्यात आलेला नाही. ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे पडताळणी दरम्यान निदर्शनास आल्यास, संबंधित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पात्रता तात्काळ रद्द करण्यात येईल, असा कडक इशाराही परिषदेने दिला आहे.
शिष्यवृत्तीच्या वितरणा बाबत आणि रकमेच्या हस्तांतरणा बाबतची पुढील सर्व प्रशासकीय कार्यवाही शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावर पार पडणार असून, अंतिम गुणवत्ता यादीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांची शिफारस त्यांच्या कार्यालयीन स्तरावर पाठविण्यात येत असल्याची माहिती परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आली आहे.
