‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सवा’त देशभक्तीचा जल्लोष; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन

मुंबईतील वरळी सी फेस येथे 'राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव' रॅली थाटात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.

मुंबई: भारतीय तिरंगा हा केवळ हातात घेण्याचा ध्वज नसून तो प्रत्येक भारतीयाच्या मनामनात व अंतःकरणात वसत असलेली राष्ट्रभावना, संविधानाचा सन्मान आणि देशाचा स्वाभिमान आहे. नवभारत घडविण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आता देशातील प्रत्येक नागरिकाची असून, ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली तरच हातातील तिरंग्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. तिरंगा यात्रा ही केवळ एक सामान्य रॅली नसून नागरिकांमध्ये देशप्रेमी भावना जागृत करणारा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. वरळी सी फेस येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ रॅलीच्या उद्घाटनाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

       वरळी सी फेस येथे पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंग्याचे महत्त्व विशद करताना देशाच्या प्रगतीचा आणि ‘नवभारता’च्या संकल्पनेचा आढावा घेतला. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, योगेश सागर, मिहिर कोटेचा, कॅप्टन तमिळ सेल्वन, राजहंस सिंह, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो मुंबईकर, तरुण, विद्यार्थी आणि एनसीसी (NCC) कॅडेट्स यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वरळी सी फेस परिसर ‘भारत माता की जय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने व देशभक्तीपर गीतांनी दुमदुमून गेला होता.

    कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजचा हा सोहळा पाहताना मला दोन सागर दिसत आहेत, एक समोर पसरलेला अथांग हिंद महासागर आणि दुसरा उपस्थित जनतेचा व राष्ट्रभक्तांचा तिरंग्याचा महासागर. ज्या तिरंग्यासाठी आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांनी हसत हसत बलिदान दिले, सीमेवर आपल्या शूर सैनिकांनी प्राणांची आहुती दिली आणि समस्त देशवासीयांनी स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत सदैव असाच दिमाखात उंच फडकत राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली आज भारताने जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली असून भारत जगातील चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे.

     देशाच्या वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले अंतराळयान यशस्वीपणे उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान (IT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), फिनटेक आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने अभूतपूर्व प्रगती साधली आहे. आज भारत जगातील दुसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून वेगाने विकसित होत असून, आपल्या देशाकडे जगातील सर्वात मोठी युवाशक्ती आहे. हा तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरलेल्या या तरुण पिढीला रोखण्याची ताकद आज जगात कोणाकडेही नाही.

      भारताची ही वेगाने होणारी घोडदौड काही परकीय व विरोधी शक्तींना खटकत असून, भारताचा विकास रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु देशाचा हा विकासाचा प्रवास कोणीही थांबवू शकणार नाही, असा स्पष्ट विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या ‘विकसित भारत’ आणि ‘नवभारत’च्या संकल्पनेतून आगामी काळात देश जगाच्या नकाशावर सर्वात अग्रस्थानी असेल, असा दृढ निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. या भव्य तिरंगा रॅलीमुळे मुंबई शहरात संपूर्ण देशभक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान

Latest News

जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जावळीत राजकीय पेच. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ३२ मतदार सहलीवर; शशिकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ....
ब्लिंकिटच्या गोदामात अस्वच्छता; एफडीएकडून परवाना निलंबित
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज तिरंगा रॅलीनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल; दुपारपासून 'हे' मार्ग राहणार बंद
पिंपरी-चिंचवडमध्ये खड्ड्यांवर आयुक्तांचा दणका; ४८ तासांत बुजवण्याचे आदेश
पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software