जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जावळीत राजकीय पेच. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ३२ मतदार सहलीवर; शशिकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ.

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून, विशेषतः जावळी तालुक्यातील घडामोडींनी संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासाठी जिल्हा बँकेत प्रवेश करण्याचा मार्ग तूर्तास अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक बनल्याचे चित्र दिसत आहे. जावळी तालुक्यातील सहकार सोसायटी मतदार संघाची ठराव प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, ४९ पैकी ४८ सोसायट्यांचे ठराव अंतिम झाले आहेत. मात्र, यातील तब्बल ३२ मतदार बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आत्तापासूनच सहलीवर पाठवल्यामुळे शिंदेंपुढील अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

       जावळी तालुक्यात ठराव प्रक्रिये दरम्यानच राजकीय संघर्षाची ठिणगी पडली होती. खुद्द मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या संपूर्ण प्रक्रियेत मैदानात उतरल्याने ही निवडणूक पहिल्याच टप्प्यात अत्यंत प्रतिष्ठेची बनली. दोन्ही बाजूंनी जास्तीत जास्त ठराव आपल्या बाजूने करण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळाली. हातगेघर येथील ठरावावरून मोठा वाद निर्माण झाला होता, जिथे भाजप नेते वसंतराव मानकुमरे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यात राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली. अपेक्षित संख्याबळ असतानाही शिंदेंना तो ठराव टिकवता आला नाही आणि तो बाद झाला. परिणामी, आता ४८ मतदारच या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीतही शिंदेंना बाजूला सारत राजकीय घडामोडी घडल्या होत्या, आणि यंदा तर अगदी सुरुवाती पासूनच मंत्री भोसले यांनी धुरा सांभाळल्याने प्रदेशाध्यक्षांना प्रत्येक पायरीवर संघर्ष करावा लागत आहे.

     स्थानिक पातळीवर शशिकांत शिंदे यांच्या गटात म्हणावे तसे राजकीय बळ किंवा सुसंवाद दिसून येत नसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, शिंदेंच्याच गटातील काही स्थानिक कार्यकर्ते पडद्याआडून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना अप्रत्यक्षपणे सहकार्य करत असल्याचे राजकीय चित्र आहे. याच गटबाजीतून आणि अंतर्गत तानातानीमुळे शिंदेंचे अनेक हक्काच्या सोसायट्यांचे ठराव बारगळले. सद्यस्थितीत शशिकांत शिंद्यांकडे जेमतेम १२ च्या आसपास मतदार उरल्याची माहिती आहे. केळघर पंचायत समितीचे सदस्य अतिष कदम यांच्यासारखे युवा नेते चांगलेच चर्चेत आले असले, तरी त्यांच्या वरोशी परिसरातील चार गावांच्या सोसायटीचा ठराव घेण्यात त्यांना आलेले अपयश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले असून, तिथले संबंधित मतदारही सध्या सहलीवर गेलेल्यांच्या गटात समाविष्ट आहेत.

      असे असले तरी, प्रतिकूल परिस्थिती असतानाही शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते अद्यापही आपला दांडगा आत्मविश्वास टिकवून आहेत. याउलट, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक कोणतीही कचाट न ठेवता अगदी नियोजनबद्धरीत्या जमिनीवर काम करत निवडणुकीची गणिते पक्की करताना दिसत आहेत. प्रत्यक्षात अद्याप निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी जावळी तालुक्यातील या राजकीय आखाड्यात कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान

Latest News

जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जावळीत राजकीय पेच. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ३२ मतदार सहलीवर; शशिकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ....
ब्लिंकिटच्या गोदामात अस्वच्छता; एफडीएकडून परवाना निलंबित
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज तिरंगा रॅलीनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल; दुपारपासून 'हे' मार्ग राहणार बंद
पिंपरी-चिंचवडमध्ये खड्ड्यांवर आयुक्तांचा दणका; ४८ तासांत बुजवण्याचे आदेश
पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software