पुण्यात ४,४२७ कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा तपास

पुण्यात ४,४२७ कोटी रुपये बेकायदेशीररीत्या परदेशात पाठवून कर चुकवल्याप्रकरणी दोन सीएंवर गुन्हा दाखल. आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू.

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरातून एक अत्यंत खळबळजनक आणि कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. कोणत्याही वैध कागदपत्रांची पडताळणी न करता तब्बल ४ हजार ४२७ कोटी ९२ लाख रुपयांहून अधिक रक्कम परदेशात पाठवून शासनाचा मोठा कर चुकवल्या प्रकरणी एका नामांकित चार्टर्ड अकाऊंटंट (CA) फर्मच्या दोन संचालकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे पुणे शहर आणि विशेषतः व्यावसायिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आयकर विभागाच्या कठोर पडताळणी नंतर समोर आलेल्या या महाघोटाळ्याप्रकरणी कोंढवा-येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

        अंकुशकुमार सुरेशचंद बगरेचा (वय ३४, रा. आचलनगर, कोंढवा) आणि मोहित शिवकुमार तोडी (वय ३३, रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन्ही आरोपी सीएंची नावे आहेत. या दोघांची 'एम एस ओडी अँड असोसिएटस' (M/s OD & Associates) नावाची फर्म असून त्यांचे कार्यालय कात्रज-कोंढवा रोडवरील शिव समृद्धी आर्केड येथे आहे. या प्रकरणी आयकर विभागाच्या सहायक संचालक तन्मयी सुहास देसाई (वय ३१, रा. निगडी प्राधिकरण) यांनी कोंढवा येवलेवाडी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. प्राप्त माहिती नुसार, हा सर्व गैरव्यवहाराचा प्रकार २०२२ ते २०२६ या कालावधीत घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

        पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, परदेशात पैशांचे व्यवहार किंवा निधी पाठविताना 'फॉर्म १५ सीबी' (Form 15CB) भरणे कायद्या नुसार बंधनकारक असते. याद्वारे सीए यांना पैशांचा मूळ स्त्रोत आणि टीडीएस (TDS) दरांची सखोल तपासणी करावी लागते. मात्र, आरोपी अंकुश बगरेचा आणि मोहित तोडी यांनी इतर संशयितांशी आपसांत संगनमत करून पूर्णपणे बेकायदेशीर मार्ग पत्करला. त्यांच्याकडे तीन विशिष्ट शेल किंवा बोगस कंपन्यांच्या व्यवहाराबाबत कोणतीही कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध नसतानाही, त्यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या चार वर्षांच्या कालावधीत परदेशी चलन पाठविण्यासाठी आवश्यक असणारे फॉर्म १५ सीबीचे प्रमाणपत्र कुठलीही खातरजमा न करता अत्यंत जाणीव पूर्वक खोटे तयार केले. एवढेच नव्हे तर, हे प्रमाणपत्र खरे असल्याचे भासवून त्यांनी ते आयकर विभागाच्या पोर्टलवर सादर केले. विशेष म्हणजे, 'फॉर्म १५ सीए' (Form 15CA) प्रमाणपत्र तयार करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसतानाही त्यांनी ते बेकायदेशीर रित्या तयार करून ऑनलाइन सादर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

       फसवणुकीचा कट रचत या दोघांनी संबंधित तीन बोगस कंपन्यांच्या आर्थिक फायद्यासाठी वरील चार वर्षांच्या कालावधीत एकूण ४ हजार ४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपये इतकी प्रचंड रक्कम परदेशात वर्ग केली. या मोठ्या उलाढाली संदर्भातील पैशांच्या स्त्रोता बाबत शासनाचा कर चुकवून थेट देशाची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आयकर विभागाने या संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सविस्तर तक्रार अर्ज दाखल केला होता, ज्याच्या आधारे कोंढवा येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले की, आयकर विभागाकडून प्राप्त झालेल्या तक्रार अर्जाच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, सध्या आयकर विभाग व पोलीस यंत्रणेकडून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कसून तपास सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे सहभाग आहेत का आणि परदेशात गेलेला हा पैसा नेमका कशासाठी वापरला गेला, याचा सखोल शोध घेतला जात असून आगामी काळात या प्रकरणातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुणे विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी

Latest News

पुणे विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी पुणे विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी
पुण्यातील लोहेगाव विमानतळाच्या १५ किमी परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईट वापरावर २२ सप्टेंबर पासून ६० दिवसांची बंदी घालण्यात आली...
पुण्यात ४,४२७ कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा तपास
पुण्यात १९ पदांसाठी भरती; प्राध्यापकांसह विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा रूट मार्च; परिमंडळ-३ मध्ये १२० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
पुणे पोलिसांचा ‘मिशन क्रॅकडाऊन’ यशस्वी; चंदन नगरमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह दोघे जेरबंद

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software