- Hindi News
- पुणे
- पुणे पोलिसांचा ‘मिशन क्रॅकडाऊन’ यशस्वी; चंदन नगरमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह दोघे जेरबंद
पुणे पोलिसांचा ‘मिशन क्रॅकडाऊन’ यशस्वी; चंदन नगरमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह दोघे जेरबंद
पुणे पोलिसांच्या 'मिशन क्रॅकडाऊन' पथकाने चंदननगरच्या वडगावशेरी भागात सापळा रचून दोन पिस्तुलांसह दोघांना अटक केली.
पुणे: शहरात वाढत्या गुन्हेगारीला आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्या समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालय सध्या अत्यंत आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय देत पुणे पोलिसांच्या विशेष ‘मिशन क्रॅकडाऊन’ पथकाने चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका थरारक कारवाईत दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. वडगावशेरी परिसरातील स्मशानभूमी जवळ सापळा रचून करण्यात आलेल्या या धडक कारवाईत आरोपींकडून दोन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा संशयास्पद व घातक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणी आर्म्स ॲक्ट नुसार कठोर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, पुणे पोलिसांचे ‘मिशन क्रॅकडाऊन’ विशेष पथक शहरात गस्त घाबत असताना, पोलीस शिपाई लालू कऱ्हे आणि हरिप्रसाद पुंडे यांना गुप्त बातमीदारा कडून अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाची माहिती मिळाली होती. चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही संशयित व्यक्ती बेकायदेशीर रीत्या शस्त्रे बाळगून कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याची ही माहिती होती. मिळालेल्या या माहितीची त्वरित खात्री करून पथकाने तातडीने सूत्रे हलवली आणि वडगावशेरी येथील स्थानिक स्मशान भूमीजवळ योग्य तो बंदोबस्त व सापळा रचला. या सापळ्यात आकाश उर्फ गजा अशोक मोरे आणि उज्ज्वल विनोद नव्हे हे दोघे संशयित अत्यंत चलाखीने अडकले. पोलिसांनी दोघांनाही तात्काळ ताब्यात घेऊन त्यांची कसून झडती घेतली असता, त्यांच्याकडे अत्यंत धोकादायक स्वरूपाची दोन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत राउंड आढळून आले.
शहरात बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी किंवा दहशत निर्माण करण्याचे प्रकार उजेडात आल्यामुळे खळबळ उडाली असून, हे दोघे संशयित नेमके कोणत्या गुन्हेगारी कटात सहभागी होते आणि त्यांनी ही शस्त्रे कोणाकडून खरेदी केली होती, याबाबत पोलीस आता सखोल तपास करत आहेत. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी पुणे पोलिसांची ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सदर यशस्वी कारवाई सहायक पोलीस निरीक्षक (API) गोरक्षनाथ खरड आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस हवालदार सुशील बेंद्रे, गणेश इथापे तसेच पोलीस शिपाई लालू कऱ्हे, हरिप्रसाद पुंडे, विलास केदारी, अमोल सरतापे आणि शुभम चिनके यांनी अतिशय धडाडीने व उत्कृष्ट समन्वय साधत मोलाची भूमिका बजावली असून, शहरात अवैध हत्यारांचा वापर करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
