- Hindi News
- पुणे
- मावळात विकासाची पोलखोल; कुसवली पठारावर रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ
मावळात विकासाची पोलखोल; कुसवली पठारावर रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ
मावळ तालुक्यातील कुसवली पठारावर पक्क्या रस्त्याअभावी रुग्णाला झोळीतून वाहून नेले. प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांचा तीव्र संताप; पाहा सविस्तर व्हिडिओ अपडेट.
पुणे: एकिकडे देश स्वातंत्र्याची ७९ वर्षे पूर्ण करत असताना आणि विकासाची नवनवीन शिखरे गाठत असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे मात्र वास्तवाचे दाहक चित्र चटका लावणारे आहे. मुंबई-पुण्यासारख्या प्रगत आणि मध्यवर्ती महानगरांना जोडणाऱ्या मावळ तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पक्क्या रस्त्या अभावी मावळमधील कुसवली पठारावरील एका आजारी वृद्ध रुग्णाला उपचारासाठी ग्रामस्थांना चक्क झोळीतून वाहून नेण्याची वेळ आली आहे. हा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याच्या दाव्यांवर आणि प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
मावळ तालुका हा औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत वेगाने विकसित होत असलेला भाग मानला जातो. या भागात रिंग रोड, एमआयडीसी (MIDC), मोठे पूल आणि विविध प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. मात्र, याच मावळ तालुक्यातील कुसवली पठार, धनगरवाडे आणि अनेक आदिवासी पाड्यांवर अजूनही साध्या पक्क्या रस्त्यांची सुविधा उपलब्ध नाही. विशेषतः पावसाळ्यात या भागातील परिस्थिती अत्यंत बिकट बनते. रस्त्यांच्या अभावामुळे आणि चिखलाच्या वाटांमुळे येथे वाहने तर सोडाच, पण चालणेही मुश्किल होते. अशा वेळी एखादी गर्भवती महिला, वृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी किंवा आजारी व्यक्ती अडकल्यास, त्यांना उपचारासाठी नेण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र येऊन झोळी अथवा खांद्याचा आधार घ्यावा लागतो.
नुकत्याच घडलेल्या या घटनेमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका थेट वाडीपर्यंत पोहोचू शकत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा पुढे आले आहे. अनेक निवडणुका आल्या, नवनवीन सरकारे आली आणि लोकप्रतिनिधी बदलले, परंतु दुर्गम भागातील नागरिकांचा मूलभूत रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. मोठ्या शहरांमधील विकास कामांच्या गप्पा मारणाऱ्या यंत्रणेने आमच्या वाड्या-पाड्यांकडेही लक्ष द्यावे, अशीर्त मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. “विकासाच्या गप्पा नकोत, आधी आम्हाला बारमाही पक्का रस्ता द्या,” अशी संतप्त भावना व्यक्त करत, कोणत्याही नागरिकाला उपचारासाठी पुन्हा झोळीचा आधार घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
