घाटकोपर मध्ये भीषण दुर्घटना; दरडी खाली घर दबले, दोघांचा मृत्यू

घाटकोपर मधील अशोक नगर येथे पहाटे डोंगराची दरड कोसळल्याने २ जणांचा मृत्यू. NDRF व बीएमसीचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू; सविस्तर अपडेट.

मुंबई: मुसळधार पावसामुळे मुंबईच्या घाटकोपर भागात एक मोठी दुर्घटना घडली  आहे. घाटकोपर-कुर्ला रोड परिसरातील अशोक नगर भागात बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण दरडी कोसळण्याच्या (लँडस्लाइड) दुर्घटनेत अनेक घरे मातीच्या आणि पत्थरांच्या मलब्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली असून, मलब्याखाली अजूनही काही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा, मुंबई महानगरपालिका (BMC), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि पोलीस दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात आहे.

      मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हादरवून टाकणारी ही दुर्घटना बुधवारी पहाटे साधारण ३ वाजून ४८ मिनिटांच्या सुमारास घडली. घाटकोपर मधील अशोक नगर जवळील गौसिया चॉल परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे डोंगराची दरड कोसळली, ज्यामुळे बाजूलाच असलेल्या अनेक घरांवर मोठ्या प्रमाणावर मलबा येऊन आदळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरामध्ये एकच तारांबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दुर्घटनेची तीव्रता पाहता मलब्याखाली ६ ते ८ नागरिक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघातात जखमी झालेल्या १८ वर्षांच्या सोहेल अंसारी आणि १४ वर्षांच्या मोहम्मद अंसारी यांच्या पायांना दुखापत झाली असून, त्यांनी स्थानिक परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे.

      घटनास्थळी तातडीने धाव घेत मुंबई अग्निशामक दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि एनडीआरएफच्या पथकांनी बचावकार्य हाती घेतले आहे. मलब्याखालून आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून, उर्वरित नागरिकांचा शोध घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मुंबईच्या महापौर रितु तावडे, पूर्व उपनगरांचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकने तसेच पोलीस उपायुक्त (DCP) गणेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण बचावकार्याची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सख्त सूचना दिल्या.

    दरम्यान, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या धोकादायक आणि दरडीच्या छायेत असलेल्या परिसरातील घरांना प्रशासनाकडून यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, सद्यस्थितीत अधिकारी परिस्थितीचा सखोल आढावा घेत असून, भविष्यातील धोका टळण्यासाठी परिसरातील इतर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्या बाबत गांभीर्याने विचार केला जात आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि किनारपट्टी भागात दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या असून, यापूर्वी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक परिसरातही खंडाळा एक्झिटजवळ टनल २ च्या भागात दरड कोसळल्यामुळे वाहतूक वळवावी लागली होती. सध्या घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त भागात मलबा हटवण्याचे आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे काम सर्वोच्च प्राधान्याने सुरू आहे.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

Latest News

इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग
कोलकाता-चेन्नई इंडिगो विमानाच्या (6E-723) इंजिनमध्ये बिघाड. पायलटने दाखवले प्रसंगावधान; २२४ प्रवाशांसह चेन्नई विमानतळावर सुरक्षित लँडिंग.
महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांचे प्रमुख केंद्र बनवणार; फडणवीसांची घोषणा
सर्वोच्च न्यायालया बाहेर ठाकरे-शिंदे गट आमने सामने; अनिल देसाई आणि नरेश म्हस्के यांच्यात शाब्दिक वाद
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित
सुपने मंडळाच्या विकासकामांना वेग; कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software