- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- राज ठाकरेंची फडणवीसांची भेट; राजकीय चर्चांना वेग
राज ठाकरेंची फडणवीसांची भेट; राजकीय चर्चांना वेग
एमएनएस अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी घेतली भेट. कुंभमेळा, मुंबई-गोवा महामार्ग व राजकीय समीकरणांवर चर्चेची शक्यता.
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या आणि महत्त्वाच्या घडामोडीची नोंद झाली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (बुधवार, १२ ऑगस्ट २०२६) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ भेंट देत ही भेट घेतली. मात्र, या भेटीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही, तरीही राज्यातील आगामी राजकीय समीकरणे आणि विविध ज्वलंत मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर या भेटीने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
गेल्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर आणि प्रशासकीय यंत्रणेवर अत्यंत आक्रमक भूमिका घेत जाहीर टीका केली होती. अशा परिस्थितीत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी नाशिकचा दौरा करून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या कामांच्या दर्जावर, नियोजनावर आणि विलंबावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारला जाब विचारला होता. निकृष्ट विकासकमा मुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
याशिवाय, चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा आणि वर्षानुवर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग हा देखील राज ठाकरेंच्या टिकेचा मुख्य केंद्रबिंदू राहिला आहे. महामार्गाची पाहणी करताना त्यांनी कंत्राट दारांच्या मनमानी कारभारावर आणि त्यांना मिळणाऱ्या राजकीय वर दहस्तावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. या सर्व पार्श्वभूमीवर, राज्यातील या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या आणि विकासा कामांच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयात ‘शिवसेना कोणाची?’, पक्षाची अधिकृत मालकी आणि निवडणूक चिन्हाशी संबंधित प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू आहे. या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडींच्या काळात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट राजकीय चर्चांना अधिक हवा देणारी ठरली आहे. जरी या भेटीचा अधिकृत अजेंडा समोर आलेला नसला, तरी या गोपनीय बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याकडे आता संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
