- Hindi News
- सातारा
- साताऱ्यात अतिक्रमणा विरोधात धडक मोहीम; गोडोली परिसर मोकळा
साताऱ्यात अतिक्रमणा विरोधात धडक मोहीम; गोडोली परिसर मोकळा
सातारा नगरपालिकेची गोडोली परिसरात अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई. अनधिकृत बोर्ड, जुना जकात नाका आणि धोकादायक झाड हटवून रस्ता केला मोकळा.
सातारा: सातारा शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे आणि अनधिकृत बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर अंकुश ठेवण्यासाठी नगरपालिकेने आता कंबर कसली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून मंगळवारी सकाळी सातारा शहरातील गजबजलेल्या गोडोली परिसरात पालिकेच्या वतीने एक धडक कारवाई मोहीम राबवण्यात आली. या कारवाई दरम्यान प्रशासनाने रस्त्यालगतचे अडथळे दूर करत सुमारे १५ अनधिकृत फलक आणि लोखंडी बोर्ड हटवले, ज्यामुळे गोडोली परिसरातील वाहतूक मार्ग अधिक सुकर झाला आहे.
मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या कठोर निर्देशानुसार आणि अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली पाच ते सहा कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने ही मोहीम फत्ते केली. गोडोली परिसरातील साईबाबा मंदिर ते जकात नाका या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारे साहित्य जप्त करण्यात आले. या मोहिमे दरम्यान गोडोली चौकातील जुना आणि न वापरत असलेला जकात नाका काढून टाकण्यात आला. तसेच, याच भागात अत्यंत धोकादायक आणि कोसळण्याच्या स्थितीत असलेले एक जुने झाडही पालिकेच्या पथकाने तातडीने हटवले, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न मार्गी लागून संभाव्य अनर्थ टळला आहे.
शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणां मुळे सर्वसामान्य नागरिक व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत पालिकेने यापूर्वीच संबंधित अतिक्रमण धारकांना अधिकृत नोटिसा बजावल्या होत्या. प्रशासनाच्या सूचनेनुसार अनेकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली, मात्र ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांच्यावर आता पालिका प्रशासनाने थेट हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे.
सध्याच्या टप्प्यात प्रशासनाकडून किरकोळ अतिक्रमणे आणि अनधिकृत फलक हटवण्याची प्रक्रिया जोमात सुरू असली, तरी शहरातील मोठ्या आणि व्यावसायिक अतिक्रमणांवर पालिका कधी आणि कसा धडक कारवाईचा बडगा उगारणार, याकडे आता संपूर्ण सातारकरांचे लक्ष लागून राहिली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि पदपथ पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करावेत, जेणेकरून नागरिकांना सुरळीत व सुरक्षित वाहतुकीचा लाभ घेता येईल, अशी तीव्र मागणी शहरवासीयां कडून होत आहे.
